नवी दिल्ली : स्मार्टफोनचा नेटस्पीड चेक करण्यासाठी 'ट्राय' म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया लवकरच नवं अॅप लाँच करणार आहे. या अॅपच्या सहाय्याने स्मार्टफोन धारकांना आपल्या स्मार्टफोनला मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीकडून योग्य त्या स्पीडनेच इंटरनेट सेवा पुरवली जातेय की नाही, याची खात्री करता येणार आहे.


 

सध्या गूगल प्ले स्टोअरवर अँड्राईड स्मार्टफोन धारकांसाठी अशा पद्धतीने नेटस्पीड तपासून देणारे अनेक नवे अॅप आहेत. मात्र त्यांनी तपासलेला नेटस्पीड अनेकदा विश्वासार्ह नसतो. यामुळेच स्वतः 'ट्राय'नेच लाँच केलेल्या या अॅपमुळे स्मार्टफोन ग्राहकांना नेटस्पीडची खातरजमा करता येईल. तसंच या अॅपमधून तपासलेला नेटस्पीड ट्रायबरोबर शेअर करण्याचीही सुविधा आहे.

 

ट्रायने लाँच केलेल्या या नेटस्पीड तपासणाऱ्या अॅपचं नाव मायस्पीड अॅप असं असून ट्रायच्या मोबाईल सेवा अॅप स्टोअरमधून ते कुणालाही डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपचं औपचारिक लाँचिंग उद्या पाच जुलै रोजी होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा नेटस्पीड चेक केल्यानंतर त्याचे डिटेल्स ट्रायला मिळतील. त्यामध्ये तुमचा फोन कोणत्या बनावटीचा आहे, त्यामध्ये कोणत्या मोबाईल सेवा ऑपरेटरचं सिमकार्ड आहे तसंच तुमचं लोकेशन या माहितीचा समावेश असेल. यामुळे तुम्हाला ज्या स्पीडने सेवा पुरवण्याचं आश्वासन मोबाईल कंपनीकडून मिळालंय, त्याप्रमाणेच तुम्हाला सेवा मिळतेय की नाही, याची खातरजमा करता येईल, तसंच तुम्हाला योग्य त्या स्पीडने नेट कनेक्टिविटी मिळतेय की नाही, याची तक्रारही करता येईल.

 

अनेकदा मोबाईल ऑपरेटर तुम्हाला टूजी, थ्रीजी किंवा आता फोरजी या पॅकेजमध्ये सेवा पुरवतात, प्रत्याक्षात तुम्हाला त्या स्पीडने सेवा मिळतच नाही. ट्रायने स्मार्टफोनधारकांना वेगवेगळ्या नेटस्पीडमध्ये किमान डाऊनलोड आणि अपलोड इंटरनेट स्पीड किती असावा याचे काही निकष ठरवून मोबाईल कंपन्यांसाठी बंधनकारक केले आहेत.