मुंबई : ट्रायने (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) मोबाईल इंटरनेट पॅक व्हॅलिडिटी 90 दिवसांवरुन एक वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरुन लहान ग्राहक इंटरनेट पॅकचा वापर अधिकाधिक वाढवतील. एका पत्रकाद्वारे ट्रायने याबाबत माहिती दिली.   ट्रायने आपल्या पत्रकात म्हटलं आहे की, “विविध मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर असा प्रस्ताव आहे की, इंटरनेट पॅक व्हॅलिडिटी 90 दिवसांवरुन 365 दिवस करावं. पहिल्यांदाच इंटरनेट पॅक वापरणाऱ्या ग्रहाकांना याचा फायदा होईल. येत्या 26 जुलैपर्यंत सर्वसामान्य लोक आणि टेलिकॉम कंपन्यांकडून याबाबत सूचना मागवल्या आहेत.”   देशातील लोकांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी आणि तंत्रज्ञान साक्षरता वाढवण्यासाठी ट्रायने अशाप्रकारे पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा पहिल्यांदाच इंटरनेट वापरणारे ग्राहक प्री-पेड प्लॅन वापरतात. मात्र, त्यांच्या पॅकला मिळणारी व्हॅलिडिटी कमी दिवसांची असते. ती वाढवल्यास अधिकाधिक लोक इंटरनेट वापराकडे वळतील, असं ट्रायचं मत आहे.