मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजीनकांत यांचा 'कबाली' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. यापैकी चर्चेचं एक कारण म्हणजे सिनेमा प्रदर्शित होण्याआधी व्हॉट्सअॅपवर रजनीकांत यांचं इमोजी बनवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या व्हॉट्सअॅपवरील इमोजीची प्रचंड चर्चा आहे.


 

 

सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, "व्हॉट्सअॅपवर रजनीकांत यांचं इमोजी बनवण्यात आलं आहे. एखाद्या कलाकाराचं, त्यातही रजनीकांत यांचं इमोजी बनवणं हे पहिल्यांदाच घडलं आहे."

 

 

आता व्हॉट्सअॅपने रजनीकांत यांना इमोजीच्या माध्यमातून गिफ्ट दिलं आहे की, व्हायरल होणाऱ्या या चर्चेचं सत्य काही वेगळंच आहे, याची पडताळणी एबीपीने केली.

 

 

रजनीकांत यांचा 'कबाली' सिनेमा 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रजनीकांत मलेशियाच्या डॉनच्या भूमिकेत दिसणार आहेत. सूट-बूट, टाय आणि चष्मा असलेल्या रजनीकांत यांच्या लूकचीही जोरदार चर्चा आहे.

 

 

व्हॉट्सअॅपवरील इमोजीचा संबंध रजनीकांत यांच्या 'कबाली'शी जोडला जात आहे. कारण हे इमोजी त्यांच्या व्यक्तिरेखेशी मिळतं-जुळतं आहे. व्हॉट्सअॅपलाही रजनीकांत यांची भुरळ पडली आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

 

 

एबीपीने या व्हायरल मेसेजची पडताळणी केली तेव्हा समोर आलं की, "हे इमोजी रजनीकांत यांना समर्पित नाही. उलट व्हॉट्सअॅप हे इमोजी आधीपासूनच आहे. सत्य असं आहे की, हे इमोजी अमेरिकेच्या टू टोन म्युझिक रेकॉर्डचे आयकॉन वॉल्ट जॅब्सको यांच्या व्यक्तिरेखेची झलक आहे.

 

 

पण चाहत्यांना हे इमोजी 'कबाली'तील रजनीकांत यांच्या व्यक्तिरेखेचं असल्याचं वाटलं. हे इमोजी निरखून पाहिल्यास तुम्हाला समजेल की, ते रजनीकांत यांच्यासारखं अजिबातच नाही. त्यामुळे एबीपीच्या पडताळणीत व्हायरल होणारा हा मेसेज चुकीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.