नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थातच ट्रायने डेटा पॅकच्या व्हॅलिडिटीमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी डेटा पॅकची वैधता 90 दिवसांची होती. आता ती 365 दिवस करण्यात आली आहे. ट्रायने प्रसिद्धीपत्रक जाहिर करून याबद्दल माहिती दिली आहे.


 

ट्रायच्या या निर्णयामुळे इंटरनेटच्या सर्वच ग्राहकांना फायदा होणार आहे. तसंच नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीही फायदा होईल. जास्त वैधतेच्या डेटा प्लॅनसाठी ट्रायकडे अनेकांनी विनंती केली होती. यात कमी किंमतीच्या आणि जास्त वैधतेच्या प्लॅन्सकडे डेटा कार्ड धारकांनी मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधलं होतं. याच धर्तीवर ट्रायने हा निर्णय घेतला आहे.

 

मोबईल कंपन्या सध्या जास्तीत जास्त 90 दिवसांच्या वैधतेचं रिचार्ज व्हाऊचर जारी करतात. जर या 90 दिवसांमध्ये ग्राहक आपला नंबर रिचार्ज करू शकला नाही तर त्याचा डेटा वाया जाण्याची शक्यता असते. ट्रायचा हा नवीन नियम लागू झाल्यावर ग्राहक 365 दिवसांपर्यंतचे रिचार्ज करू शकतील. तसंच शिल्लक असलेला डेटा वापरता यावा यासाठी ट्राय लवकरच पावलं उचलणार आहे.