एप्रिल महिन्यात भारत सरकारच्या टीक-टॉक अॅप प्लेस्टोअर वरुन काढण्याच्या आदेशामुळे कंपनीला जवळपास दीड कोटी युजर्सचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.  'सेंसर टॉवर'च्या रिपोर्टमध्ये नुकतीच ही माहिती समोर आली आहे. पॉर्नोग्राफीक कंटेंटमुळे मद्रास उच्च न्यायालयाने तीन एप्रिलला केंद्र सरकारला टीक-टॉक अॅपवर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सरकारकडून कंपनीला हे अॅप प्लेस्टोअरवरुन काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते.


१८ एप्रिलला टीक-टॉक अॅप प्लेस्टोअरवरुन काढून टाकण्यात आले होते. आक्षेप घेण्यात आलेला कंटेंट काढून टाकल्याचे कंपनीने सांगितल्यानंतर ही बंदी उठवण्यात आली आहे. मात्र या दोन आठवड्यांत कंपनीला दीड कोटी नवे युजर्स गमवावे लागल्याची माहिती एका रिपोर्टमध्ये समोर आली आहे. टीक-टॉकवर बंदी आली नसती तर एप्रिल महिन्यातील युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता होती. मात्र मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये टीकटॉकचे जगभरातील डाउनलोड 33 टक्क्यांनी घटलं आहे.

टीक-टॉकवर बॅन करण्यात आलं नसतं तर एप्रिल महिन्यात जवळपास तीन कोटी नवीन युजर्स जोडण्याची शक्यता होती. मात्र या अॅपवर बंदी आल्याने हे प्रमाण घटलं आहे. 2019 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टीक-टॉकला जगभरातून 18.8 कोटी नवे युजर्स जोडले गेले आहेत.