मुंबई : पेट्रोल आणि डिझेल या पारंपारिक इंधनाला असलेले पर्याय आता प्रत्यक्षात येताना दिसू लागले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात होऊ घातलेल्या या मोठ्या बदलाचे आणि त्यात होत असलेल्या संशोधनाचे परिणाम भारतासह जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत.

टेस्लाची ही गाडी पूर्णपणे वीजेवर चालणारी आहे. पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी 135 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट चालते.

सॉफ्टवेअरमध्ये आघाडीवर असलेल्या टेस्लाच्या याच कारने जागतिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची आणि परिणामानं जागतिक राजकारणाची सगळी गणितं बदलून टाकलीय.

विजेवर चालणाऱ्या कार जगात बहुतांश देशांत तयार होतात. अगदी भारतातही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची e2o ( इटूओ) ही वीजेवरची गाडी आहे. पण या गाड्यांची ओळख मुख्यतः सिटी कार म्हणूनच राहिली. या गाड्यांचा वेग अत्यंत मर्यादितच आहे, आणि मुख्य म्हणजे चढावावर या गाड्या दम सोडतात. पण टेस्लाच्या या एस मॉडेलनं सगळ्या मर्यादा पार करून अमेरीकेच्या रस्त्यांवर सुसाट वेग घेतांना सगळ्याच प्रतिस्पर्ध्यांना कित्येक किलोमिटर मागे टाकलं.

शेव्हरोले, स्कोडा, वॉक्सवॅगन या दुसऱ्या कंपन्यांनी आता कंबर कसलीय. टेस्लाच्या धसक्यानं म्हणा की संशोधन अंतिम टप्प्यात आल्यानं म्हणा, शेव्हरोलेनं भारतातली आपली गाड्यांची विक्री पूर्णतः बंद केलीय. स्कोडा आणि वोक्सवॅगनही त्याच मार्गावर आहेत. अर्थात भारतात उत्पादन बंद झालेलं नाही, पण तयार होणाऱ्या गाड्या मुख्यतः लॅटीन अमेरीकन आणि अफ्रीकी देशांमध्ये निर्यात होणार असल्यानं निदान पुढची काही वर्ष तरी ते सुरूच रहाणार आहे.

टेस्लानं त्यांची ही बहुचर्चित एस मॉडेल विकण्यासाठी भारतातही सुपर डिस्ट्रीब्युटरची नेमणूकही केली आहे.

जागतिक राजकारणाची समिकरणंही या एका कारनं बदलली आहेत. फ्रान्सचे तरूण राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पुढच्या दशकभरात फ्रान्समध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद करण्याची घोषणा केली. त्यामुळे तेलाचं अर्थकारण आता फार काळ चालणार नाही याची पहिल्यांदा जाणीव झाली ती दुबई म्हणजे युएई आणि सौदी अरेबिया या दोन देशांना. दुबईनं तेलाचं राजकारण सोडून जागतिक बाजापेठेचं आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा केंद्रबिंदू बनण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केलीय. सौदी अरेबियांनंही देशातले कायदे सैल करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र बेटं विकसित करण्याचा निर्णय घेतलाय.