नवी दिल्ली : तरुणांमध्ये पबजी (PUBG) या ऑनलाईन गेमचे वेड वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून या गेमचे दुष्परिणाम समोर येत आहेत. अनेक तरुण 'पबजी'च्या आहारी जाऊन आत्महत्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. यावर उपाय म्हणून पबजी हा ऑनलाईन गेम केवळ सहा तास खेळण्याचं बंधन युजर्सवर घालण्यात येणार आहे. पबजीवर वेळेचे बंधन लादले जाणार असल्याच्या अनेक बातम्या प्रसारित झाल्या आहेत. परंतु अद्याप या फीचरबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.


दरम्यान काही युजर्सनी याबाबत तक्रार केली आहे. या युजर्सच्या तक्रारीनुसार त्यांना पबजी खेळताना सहा तासांपेक्षा अधिक वेळ झाल्यानंतर खेळाचे सहा तास पूर्ण केल्याचे नोटिफिकेशन मोबाईलवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक युजर्सनी त्याचे काही स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले आहेत.

पबजीमुळे आत्महत्या, नैराश्य, परीक्षांमध्ये अपयश अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भारतात पबजीवर बंधन लादले जावे, अशी मागणी होत आहे. तसेच 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना ठराविक तास पबजी खेळल्यानंतर नोटिफिकेशन पाठवले जाते. परंतु नव्या नियमांविषयी पबजीतर्फे अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, गुजरातमधील राजकोट आणि सूरत या दोन शहरांमध्ये राज्य सरकारने पबजीवर बंदी घातली आहे. तसेच देशातील इतर राज्यांतूनही पबजीवर बंदी घालण्याची सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पबजी खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले आहे.