मुंबई : राज्य सरकारने महमित्र’ अॅप गूगल स्टोअरवरुन काढले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काही दिवसांपूर्वीच आरोप केला होता की, ‘महामित्र’ अॅपवरुन डेटा चोरी होत आहे.


महमित्र अॅप गूगल प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अॅपच्या कारभाराबाबत आज पुन्हा संशय व्यक्त केला आहे. महमित्र अॅपवरचा सर्व डेटा 'अनुलोम' या खासगी संस्थेला वळवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी 27 मार्च रोजी विधानसभेत केला होता. आता हे अॅप शासनाकडून बंद केल्याने संशय बळावत असल्याचं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी काय प्रश्न उपस्थित केले आहेत?

- महमित्र अॅप अचानक का काढण्यात आलं?

- अॅप कोणाच्या अधिकारात काढण्यात आलं? गूगलच्या की DGIPR च्या?

- महमित्र अॅपचे डेव्हलपर कोण आहेत?

- गृहराज्य मंत्र्यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं होतं की, अनुलोम आणि DGIPR मध्ये करार झाला होता. या कराराचं स्वरुप काय होतं? अनुलोमला याबदल्यात मोबदला मिळाला का? अनुलोमला कुठल्या निकषांवर निवडण्यात आलं?

- शासनाने निवडलेल्या 300 महमित्रांना निवडल्याचे निकष काय? त्यांचे नाव, पत्ते आणि मानधन सरकार जाहीर करेल का?

सरकारचे स्पष्टीकरण

सोशल मीडिया महामित्र उपक्रम विशिष्ट कालावधीपुरता असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. हे उपक्रम संपल्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन पुढे सुरु ठेवण्याची आवश्यकता नसल्याने हे ॲप्लिकेशन आता प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही, अशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

24 मार्च 2018 रोजी या उपक्रमाचा राज्यस्तरीय सोहळा पार पडला. त्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे डिजिटल प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानंतर हे ॲप्लिकेशन पुढे सुरु ठेवण्यात काहीच हाशील नसल्याने ते आता प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. मुळातच या उपक्रमात सहभागी व्यक्तींची नोंदणी करणे आणि समाजमाध्यमातील त्यांचे काम पाहून त्यांचा सन्मान करणे, एवढ्यापुरतेच या उपक्रमाचे उद्दिष्ट होते, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.