नवी दिल्ली : तुम्ही टाटा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने आपल्या गाड्यांच्या किंमती तब्बल 12 टक्क्यांपर्यंत घटवल्या आहेत.


टाटाच्या कारमध्ये 3 हजार 300 पासून ते 2 लाख 17 हजारांपर्यंत घट करण्यात आली आहे. गाड्यांचे मॉडेल्स आणि पेट्रोल-डिझेल प्रकारानुसार ही सूट दिली जाणार आहे.

1 जुलैपासून देशात जीएसटी ही नवी करप्रणाली लागू झाली. त्यानंतर सर्वच क्षेत्रावर या करप्रणालीचा परिणाम पाहायला मिळाला. नव्या करांमुळे अनेक कंपन्यांनी आपापल्या वस्तूंचे दर कमी-जास्त केले.

ऑटोमोबाईल क्षेत्रात मारुती सुझुकी, फोर्ड आणि होंडा या कंपन्यांनंतर आता टाटा मोटर्सनेही आपल्या गाड्यांच्या किंमती घटवल्या आहेत.

जून 2017 मध्ये टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या विक्रीत 5 टक्क्यांनी घट झाली होती. त्यामुळे आता गाड्यांच्या किंमती कमी झाल्यानंतर विक्रीत वाढ होण्याची आशा कंपनीकडून व्यक्त केली जात आहे.