मुंबई: देशभरात आता बऱ्याच महत्वाच्या ठिकाणी आधारकार्डची मागणी केली जाते. त्यामुळे आधारकार्ड हे एक महत्वाचं सरकारी ओळखपत्र झालं आहे. आधारकार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची अत्यंत महत्वाची माहिती उपलब्ध होऊ शकते.
आधारकार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मदिनांक, डिजिटल सही यासोबतच तुमच्या हाताचे, बोटांचे ठसे यासह बायोमेट्रिक माहिती माहिती डिजिटल स्वरुपात साठवली जाते. डिजिटल स्वरुपात ही माहिती असल्यानं तिला धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशात मोठ्या प्रमाणात सोशल क्राईमचं प्रमाण वाढत त्यामुळे आधारकार्ड संबंधित डिजिटल माहितीलाही हॅकर्सकडून धोका नाकारता येत नाही. त्यामुळेच आता आधारकार्ड संबंधित बायोमेट्रिक माहिती सुरक्षित करता येणार आहे. UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला तुमची आधारकार्ड संबंधित माहिती सुरक्षितपणे सेव्ह करता येणार आहे.
असा करा आधारकार्डचा बायोमेट्रिक डेटा सुरक्षित :
1. बायोमेट्रिक डेटा लॉक करा
- एकदा का तुम्ही तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक केलात तर इतर कुणीही ती माहिती पाहू शकत नाही. तुमचा पत्ता, वय, यामध्ये मात्र तुम्हाला हवा तेव्हा बदल करता येऊ शकतो. पण तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक होईल. https://resident.uidai.net.in/biometric-lock बायोमेट्रिक डेटा लॉक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
- या लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचा 12 आकडी आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर एक कोड आणि वन टाइम पासवर्ड टाकावा लागेल. (जो तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर असेल त्यावर वन टाइम पासवर्ड तुम्हाला मिळेल.) त्यानंतर पुढच्या पेजवर जाऊन तुम्हाला तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक करता येईल.
- जर तुम्हाला ही माहिती अनलॉक करायची असेल तर तुम्ही ती देखील करु शकता. वरील लिंकवर जाऊन त्याप्रमाणे सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला माहिती अनलॉक करता येईल.
2. गरज नसल्यास कुणालाही तुमच्या आधारकार्डचा फोटो किंवा डिजिटल माहिती देऊ नका, तसेच तुमचा आधार क्रमांक कुणालाही शेअर करु नका. आधार क्रमांकावर तुमची संपूर्ण माहिती उपलब्ध असते.
3. जर एखाद्या व्यक्तीला तुमचं आधारकार्डची झेरॉक्स हवी असल्यास त्या व्यक्तीकडून त्याचं कारण लिहून घ्या आणि ते सेल्फ अटेस्टेड करुन घ्या.