नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणात फ्री वायफाय वापरायला मिळत नाही. त्यामुळे कुठे फ्री वायफाय मिळत असेल तर 73 टक्के भारतीय वैयक्तिक माहिती द्यायलाही तयार असतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.


अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी नॉर्टनने हे संशोधन केलं आहे. सेवा निवडताना फ्री वायफाय हा देखील एक मोठा मुद्दा बनला आहे. जिथे फ्री वायफाय असेल, त्याच सेवेला लोक जास्तीत जास्त पसंती देतात, असं या संशोधनात म्हटलं आहे.

हॉटेल निवडताना 82 टक्के, परिवहन सेवा निवडताना 67 टक्के, विमान सेवा निवडताना 64 टक्के, 62 टक्के लोक रेस्टॉरंट निवडताना तिथे फ्री वायफाय आहे की नाही, याची पडताळणी करतात आणि त्यानंतरच पर्याय निवडतात.

फ्री वायफाय मिळाल्यानंतर जवळपास 51 टक्के भारतीय इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी प्रतीक्षाही करु शकत नाही, असं संशोधनात म्हटलं आहे.

जवळपास 19 टक्के लोक फ्री वायफायसाठी वैयक्तिक मेल, संपर्क ही माहिती शेअर करायला तयार असतात. तर 22 टक्के या सेवेसाठी वैयक्तिक फोटोही शेअर करायला तयार असतात. विशेष म्हणजे 74 टक्के लोकांचं म्हणणं आहे की सार्वजनिक ठिकाणी फ्री वायफाय वापरताना त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित असते.