नोएडाः  कोणतीही वस्तू विकायची असेल तर लगेच पर्याय समोर येतो तो olx या ई कॉमर्स वेबसाईटचा.. हाच फंडा आता चोरटेही वापरु लागल्याचं दिसतंय. कारण नोएडामध्ये अशी एक घटना  समोर आली आहे, ज्यामुळे तुम्ही जुनी वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी अनेकदा विचार कराल.

 

नोएडातील इस्टेट एजंट कुलवंत सिंह यांची होंडा सिटी कार ऑगस्ट महिन्यात राहत्या घराच्या पार्कींगमधून चोरी गेली होती. त्यानंतर कुलवंत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र तरीही कार मिळाली नाही.

 

कुलवंत दुसरी कार घेण्यासाठी olx वर सर्फिंग करत होते. मात्र सर्फिंग करताना olx वर त्यांना चक्क त्यांचीच चोरी गेलेली कार मिळाली. त्यानंतर कुलवंत यांनी पोलिसांच्या साहाय्याने अहमद नावाच्या संबंधित जाहिरातदाराशी संपर्क साधला.

 

अहमदने ही कार आपण दुसऱ्याकडून खरेदी केली असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना अहमदला ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.