सॅन फ्रांन्सिस्कोः इंटरनेट युजर्सचं हायस्पीड इंटरनेटचं स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांनी अॅटलांटिक समुद्रात एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत नवीन आणि अत्याधुनिक अशी तब्बल 6600 किलोमीटर लांबीची फायबर केबल टाकण्यासाठी करार केला आहे.


 

एका वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता

अॅटलांटिक समुद्रातून जवळपास 6600 किलोमीटर लांबीची केबल टाकण्यात येणार आहे. ही एमएआरईए केबल 160 टीबीपीएस क्षमतेने इंटरनेट सेवा देणारी असणार आहे. केबल टाकण्याचे काम यावर्षी ऑगस्टमध्ये सुरु करण्यात येणार असून ऑक्टोबर 2017 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

 

यामुळे वाढेल इंटरनेट स्पीड

तेलसिअस ही दूरसंचार कंपनी या केबल प्रणालीचं संचालन आणि नियंत्रण करणार आहे. या प्रणालीमुळे अमेरिका पहिल्यांदाच दक्षिण युरोपशी जोडली जाणार आहे. अमेरिकेतील उत्तर व्हर्जिनिया शहर या केबलमुळे बिलवाओ, स्पेन, युरोप, अफ्रिका, पूर्व आणि मध्य आशिया यांच्या नेटवर्क हब सोबत जोडलं जाणार आहे. त्यामुळे इंटरनेट स्पीडची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

 

मायक्रोसॉफ्ट ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहे. येत्या काळात कंपनी स्काईप, बिंग, ऑफिस 265 आणि एक्सबॉक्स यांसह इतर 200 सेवा फास्ट प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या विचारात आहे, असं मायक्रोसॉफ्ट कंपनीचे महाप्रबंधक क्रिस्टीन बेलाडे यांनी सांगितलं.

 

फेसबुक देखील युजर्सना चांगली सेवा देण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. फेसबुक वापरकर्त्यांना या करारामुळे फायदा होणार असून ऑनलाईन कनेक्टीव्हीटी अधिक चांगली होणार आहे, असं फेसबुक नेटवर्क इंजीनिअरिंगचे उपाध्यक्ष नजम अहमद यांनी सांगितलं.

 

इंटरनेट वापरकर्त्यांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी सध्या अनेक कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक देखील याला अपवाद नाहीत. आपल्या युजर्सला चांगली इंटरनेट सेवा देण्यासाठी हा करार महत्वाचा ठरणार असल्याचा दोन्ही कंपन्यांना विश्वास आहे.