नवी दिल्ली : पाकिस्तान म्हटल्यावर सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते क्रिकेट, काश्मीर आणि दहशतवाद. अर्थात काही लोकांच्या डोळ्यासमोर शाहीद आफ्रिदी, राहत फतेह अली खान, आतिफ असलम, गुलाम अली यांसारख्यांच्या नावं ही येतातच. मात्र, तुम्ही असे कधी ऐकलं आहे का, एखादी व्यक्ती पाकिस्तानात गेलीय आणि तिने तिथल्या परंपरेचं, सुंदरतेचं भरभरुन कौतुक केलं आहे. पण एका स्पॅनिश महिलेने ते केलंय आणि तिची फेसबुक पोस्ट पाकिस्तनासह जगभरात व्हायरल झाली आहे.

 

स्पेनची रहिवाशी असणाऱ्या क्लारा अरिगीची पाकिस्तानवरील फेसबुक पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. क्लाराने पाकिस्तानची एक वेगळी ओळख आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जगासमोर ठेवली. क्लाराची पाकिस्तानवरील फेसबुक पोस्ट आतापर्यंत 19 हजाराहून अधिक जणांनी शेअर करण्यात आली आहे.

 

क्लाराने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, “सहा महिन्यांसाठी पाकिस्तानात जाण्याचं कंपनीने सांगितल्यावर मी चिंतेत पडली. पाकिस्तानात जायला सांगितल्यापासून याचाच विचार करत होते की, पाकिस्तानात जाणं टाळता कसं येईल? धुरळ्याने भरलेले रस्ते, ट्रॅफिक, अस्वच्छता यांमध्ये मला माझे सहा महिने घालवायचे नव्हते. शिवाय, संपूर्ण शरीर झाकूनही जगायचं नव्हतं आणि दहशतवादी, कट्टरतावाद्यांमध्ये तर अजिबातच राहायचं नव्हतं. मात्र, यादरम्यान मला कुणीतरी सांगितलं की, तुम्ही पाकिस्तान जाता तेव्हा दोनदा रडता. पहिल्यादा तिथे जाण्यावेळी आणि दुसऱ्यांदा तिथून परत येताना. म्हणून मी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला.” असं सारं असतानाही, पाकिस्तानात राहिल्यानंतर क्लाराचं त्या देशाबद्दलचं मतच बदललं. देशाची सुंदरता, खाणं-पिणं आणि तेथील लोक क्लाराला मनापासून आवडली.

 

“पाकिस्तान नक्कीच वेगळं आहे. इथली परिस्थिती, संस्कृती, शहरं सर्वकाही वेगळे आहेत. महिला रंग-बेरंगी कपडे परिधान करतात. पुरुष इंग्रजांचे खेळ खेळतात. सुंदर सुंदर डोंगररांगा आहेत. अद्भूत निसर्गसौंदर्य आहे. अलिशान मशिदी आहेत.”, असेही क्लाराने फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय, आयुष्यात एकदा तरी पाकिस्तानचा दौरा करायला हवा, असेही क्लाराने फेसबुक पोस्टमधून आवाहन केलं आहे.

 

क्लारा अरिगीची ही फेसबुक पोस्ट पाकिस्तानसह जगभरात व्हायरल झाली असून, सोशल नेटवर्कवर चर्चेचा विषय ठरली आहे.