नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून नोकिया आपल्या नव्या अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनवरून चर्चेत आहे. कंपनीचा हा नवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन नुकताच गीकबेंचवर स्पॉट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे फोनचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. मात्र, अॅन्ड्रॉइड तंत्रज्ञान नाकारलेल्या नोकियाने कंपनीची हरवलेली पत पुन्हा मिळवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या नव्या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव नोकिया 5320 असे असण्याची शक्यता आहे. तसेच हा स्मार्टफोन क्वार्ड कोर प्रोसेसर, 2GB रॅम आणि अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या सर्वात जुन्या 4.4 व्हर्जनवर काम करेल. असे सांगण्यात आले आहे.
या लिस्टिंगमध्ये नोकियाचा दुसरा स्मार्टफोनही स्पॉट करण्यात आला आहे. या दुसऱ्या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर RM-1490 असेल. तसेच हा स्मार्टफोन 2GB रॅमने आणि जॅली बिन म्हणजे किटकॅटपेक्षाही जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करेल असे सांगण्यात येत आहे.
गीकबेंचच्या या लिस्टिंगनुसार इतर स्मार्टफोनपेक्षा नोकियाचा हा नवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनची माहिती फारच जुनी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही माहिती खरी असल्यास नोकियाची बाजारातील पत आणखीनच ढासळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
यापूर्वी नोकियाच्या या नव्या स्मार्टफोन संदर्भात लीक झालेल्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन 5.2 इंच आणि 5.5 इंच QHD स्क्रिन आणि फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. तसेच यामध्ये नव्या प्रकाराचे कॅमेरे असतील. याशिवाय यामध्ये स्प्लीट स्क्रिन मोड आणि 3D टचसारखे तंत्रज्ञान उपलब्ध असेल, असे सांगण्यात येत आहे.
बाजारातील आपले नाव कायम राखण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करत असलेल्या नोकियाने मे महिन्यात एक निवेदन प्रकाशित केले होते. यानुसार कंपनीला मोबाईल फोन आणि टॅबलेट बनवण्याचा परवाना मिळाल्याचे सांगण्यात आले होते.