मुंबई : फेसबुकच्या डेटा लीकचं वारं आता भारतापर्यंत येऊन पोहोचले आहे. ज्या सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनीने फेसबुकचा डेटा लीक केल्याचा आरोप केला जात आहे, त्या कंपनीला 2019 सालासाठी काँग्रेसने कॅम्पेनिंगसाठी निवडल्याचा आरोप केला जात आहे. ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसला ट्रोल केले जात आहे.


ट्विरवर ट्रेण्ड

ट्विटरवर #DataChorCongress हॅशटॅग वापरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. काँग्रेसने भारतीयांची माहिती परदेशी कंपनीला दिली असल्याचा आरोप करत, राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. विशेष म्हणजे, हा हॅशटॅग ऑल इंडिया ट्रेण्ड होत असल्याने त्याबद्दल सोशल मीडियावरील चर्चेला उधाण आले आहे.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचाही काँग्रेसला प्रश्न

विशेष म्हणजे, कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका आणि काँग्रेस पक्ष यांच्यात काय संबंध आहे, हे स्पष्ट करावे, असे म्हणत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी, किती भारतीयांची माहिती काँग्रेसने केम्ब्रिज अॅनॅलिटिकासारख्या परदेशी कंपनीला दिले आहेत?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

रविशंकर प्रसाद यांचा थेट मार्क झुकरबर्गला इशारा

“मिस्टर मार्क झुकरबर्ग, भारताच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं निरीक्षण काय असतं, हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे जर भारतीयांची माहिती चोरली गेली, तर ते सहन केले जाणार नाही. आमच्याकडे तंत्रज्ञानविषयक कायदे कठोर आहेत.”, अशा इशारा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना दिला.


दिव्या स्पंदना यांचे उत्तर

काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी या आरोपांनी ट्विटरवरुनच उत्तर दिले आहे. त्यांनी स्वतंत्र ट्वीट करुन म्हटले आहे की, “काँग्रेस आणि केम्ब्रिज अॅनॅलिटिका यांचा संबंध असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.”


विषयांतरासाठी भाजपची चाल

“केम्ब्रिज अॅनॅलिटिका-काँग्रेस संबंधाच्या बातम्या फेक असून, डेटा चोर काँग्रेस हॅशटॅघ म्हणजे 39 भारतीयांचा मृत्यू आणि अविश्वास ठरावावरुन लक्ष वळवण्यासाठी काढले जात हे.”, असे काँग्रेस नेते तहसीन पुनावाला यांनी म्हटले आहे. तसेच, “माझ्या माहितीनुसार, काँग्रेसचा कुठल्याही प्रकारे केम्ब्रिज अॅनॅलिटिकाशी संबंध नाही. त्यामुले #DataChorCongress हॅशटॅगवर शंका उपस्थित होते.”, असेही ते म्हणाले.


केम्ब्रिज अॅनॅलिटिका काय आहे?

केम्ब्रिज अॅनॅलिटिका ही सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि डिजिटल सपोर्ट या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून, जगातील अनेक देशांमध्ये सुमारे 100 हून अधिक कॅम्पेन्स या कंपनीने केले आहेत. राजकीय निवडणुकांमध्ये एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करत, त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करण्याचे काम कॅम्ब्रिज अॅनॅलिटिका करते.

फेसबुक लीकचं नेमकं काय प्रकरण आहे?

2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे. यावरुन अमेरिकेसह जगभरात आता खळबळ उडाली आहे.

फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’

लाखो युजर्स फेसबुकला राम राम करु लागले आहेत. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे. अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’

फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसान