मुंबई : भारत हा गरिबांचा देश आहे, त्यामुळे भारतात स्नॅपचॅटचा यूझर बेस वाढवणार नाही, असं विधान स्नॅपचॅटच्या सीईओनं केलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारतात स्नॅपचॅटसारख्या अॅप्सना नेटसव्ही मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत.
'व्हरायटी'नं दिलेल्या वृत्तानुसार स्नॅपटॅटचा सीईओ ईवान स्पीजेलनं 2015 मधील यूझर बेसवरील बैठकीवेळी भारताविषयी हे विधान केलं आहे. स्नॅपचॅट फक्त श्रीमंत लोकांसाठीच असून त्याचा यूझर बेस श्रीमंत देशांमध्येच वाढवण्यात येणार असल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं.
बैठकीवेळी एका कर्मचाऱ्यानं भारतासारख्या देशात स्नपचॅटचा विस्तार धिम्यागतीनं होत आहे. त्यामुळे भारतासारख्या देशांच्या यूझर बेसवर काम करण्याची गरज असल्याचं मत मांडलं. मात्र त्याचं म्हणणं मध्येच खोडून काढत स्पीजेलनं स्नॅपचॅट हे गरिबांसाठी नसून केवळ श्रीमंतांसाठीच आहे. त्याचा विस्तार भारत आणि स्पेनसारख्या गरिब देशांमध्ये करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
भारतात गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी अॅप्सच्या यूझर बेसमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच अॅमेझॉन आणि उबरसारख्या कंपन्यांनी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. 2020 पर्यंत परदेशी अॅप्सचा भारतातील यूझरबेस अडीच टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.