सियोल : स्मार्टफोनप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेली दक्षिण कोरियाची जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंग फोल्डिंग टॅब्लेट-कम-स्मार्टफोन घेऊन येत आहे. आकर्षक लूक्स, अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इत्यादींमुळे सॅमसंगकडे विश्वासाहाने पाहिले जाते. आता सॅमसंग फोल्डिंग स्मार्टफोन आणणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

पुढल्या वर्षी म्हणजे 2017 साली हा फोल्डिंग टॅब्लेट कम स्मार्टफोन स्मार्टफोनप्रेमींसाठी बाजारात दाखल होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा टॅब्लेट-कम-स्मार्टफोन कधी बाजारात येणार, याबाबत मोबाईलप्रेमींना उत्सुकता लागली होती. अखेर पुढल्या वर्षी हे डिव्हाईस बाजारात दाखल होत असल्याने मोबाईलप्रेमी खुश होतील, हे नक्की.



एका मीडिया रिपोर्टनुसार, या फोल्डिंग टॅब्लेटचा आकार फोल्ड झाल्यानंतर पाच इंच आणि उघडल्यानंतर सात इंच असेल. कोरियन वृत्त वेबसाईट इटी न्यूजच्या रिपोर्टनुसार, कंपनीने या डिव्हाईसचं प्रोटोटाईप तयार केलं असून यावर्षीच जूननंतर उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे.

 

सॅमसंग डिस्प्लेचे संचालक ली चांग-हगोन यांनी जानेवारीमध्ये म्हटलं होतं की, “हे डिव्हाईस अतिशय प्लॅनिंगने तयार केलं आहे. मोठ्या प्रमाणात या डिव्हाईसचं उत्पादन करण्यचा कंपनीचा मानस आहे. शिवाय, विक्रीसाठी विविध डिलर्सना सोबत घेऊ.”