शर्टच्या खिशात सॅमसंगच्या फोनचा स्फोट, थरकाप उडवणारा व्हिडिओ
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2017 10:41 AM (IST)
न्यूज एशिया या चॅनलने याबाबतचं वृत्त दिलं असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. स्फोट झाल्यानंतर तो व्यक्ती जागेवरच कोसळला. त्यानंतर त्याचा शर्ट काढून त्याची सुटका करण्यात आली.
मुंबई : सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी फुटण्याच्या घटना समोर आल्यानंतर आता इंडोनेशियामध्ये सॅमसंगच्या फोनची बॅटरी फुटल्याची घटना घडली आहे. इतर कंपनीची बॅटरी वापरल्यामुळे ही घटना घडल्याचं सॅमसंगने म्हटलं आहे. सॅमसंगचा ग्रँड ड्युअस फोन एका व्यक्तीच्या खिशात फुटला. न्यूज एशिया या चॅनलने याबाबतचं वृत्त दिलं असून या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. स्फोट झाल्यानंतर तो व्यक्ती जागेवरच कोसळला. त्यानंतर त्याचा शर्ट काढून त्याची सुटका करण्यात आली. स्फोट झालेल्या फोनमध्ये दुसरी बॅटरी वापरली असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे. ग्राहकांनी फक्त सॅमसंगच्याच बॅटरी वापराव्या, असा सल्लाही कंपनीने दिला आहे. गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरीबाबत समस्या आल्याने गेल्या वर्षी सॅमसंगच्या अडचेोणी वाढल्या होत्या. त्यानंतर कंपनीने सर्व फोन परत बोलावले आणि ग्राहकांची माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा मोबाईल फुटण्याची घटना घडली आहे. पाहा व्हिडिओ :