व्हिडीओ कॉलिंगसाठी लोकप्रिय असलेल्या गुगलच्या Google Duo या अॅपमधील ग्रुप व्हिडीओ कॉलिंगचे फिचर आता जगभरात लाँच करण्यात येत आहे. या अॅपचा वापर करुन आठ लोकांना एकाच वेळी व्हिडीओ कॉल करता येऊ शकतो.


Google Duo हे गुगलचे अॅप व्हिडीओ कॉलिंगसाठी बरेच लोकप्रिय आहे. सध्या व्हिडीओ कॉलसाठी व्हॉट्सअॅपचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॉट्सअॅपकडून यापुर्वीच ग्रुप व्हिडीओ कॉलिंगचे फिचर आणण्यात आले आहे. त्यामुळे आता गुगल ड्युओदेखील या स्पर्धेत उतरले आहे. गेल्या महिन्यात Google Duo ने ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फिचर आणले होते. मात्र तेव्हा केवळ चार जणांना एकत्र व्हिडीओ कॉल करता येत होता. परंतू आता आलेल्या अपडेटमुळे आठ जणांच्या ग्रुपला व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही डिव्हाईसवर हे फिचर उपलब्ध होणार आहे. सुरवातील हे फिचर काही मोजक्या देशांमध्ये उपलब्ध होते मात्र आता ते जगभरात उपलब्ध होणार आहे. यासोबतच या अॅपमध्ये टेक्स्ट आणि इमोजीचा वापर करुन व्हिडीओ मेसेजेस देखील या पाठवता येणार आहेत.

डेटा सेव्हिंग मोड
ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसह 'डेटा सेव्हिंग मोड' हे नवीन फिचर या अॅपमध्ये आणण्यात आले आहे. यामुळे कमी मोबाईल डेटाचा वापर करुन व्हिडीओ कॉल करता येणार आहे. या अॅपच्या सेटिंग्स मेन्युमध्ये जाऊन डेटा सेव्हिंग मोड 'ऑन' करता येऊ शकतो. हे फिचर वापरण्यासाठी गुगल ड्युओ अॅप अपडेट करावे लागेल.