मुंबईः ऑनलाईन शॉपिंग कसं धोकादायक ठरु शकतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. फ्लिपकार्ट विरोधात मोबाईलऐवजी पार्सलमध्ये साबण पाठवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

वाळकेश्वर येथील नागरिक आनंद भालकिया यांनी सॅमसंग गॅलक्सी नोट 4 हा फोन ऑर्डर केला होता. पण फोनऐवजी फ्लिपकार्टने निरमा साबण पार्सल पाठवला, असं वृत्त हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.

 

भालकिया यांनी फ्लिपकार्ट कस्टमर केअरसोबत संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी फ्लिपकार्ट विरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

असा घडला प्रकार

 

आनंद भालकिया यांनी 25 मे रोजी सॅमसंग गॅलक्सी नोट 4 हा फोन ऑर्डर केला होता, ज्याची डिलीव्हरी 30 मे रोजी करण्यात आली. हा फोन कॅश ऑन डिलीव्हरीवर ऑर्डर करण्यात आला होता. पार्लस मिळाल्यानंतर भालकिया यांनी डिलीव्हरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तिकडे 29 हजार 900 रुपये दिले. मात्र पार्सल उघडल्यानंतर त्यामध्ये साबण आणि अँड्रॉईड फोनंच चार्जर होतं. या प्रकाराची तक्रार केल्यानंतर फ्लिपकार्टने पैसे परत केले, असं भालकिया यांनी सांगितलं.

 

दरम्यान अतंर्गत गोंधळामुळे हा प्रकार घडला असावा, असं फ्लिपकार्टच्या वतीने सांगण्यात आलं. या प्रकाराची चौकशी केली जाणार असून ग्राहकाला पैसे परत केले आहेत, असं फ्लिपकार्टच्या प्रतिनिधीने सांगितलं.

 

पोलिस या प्रकरणी डिलीव्हरी केलेल्या व्यक्तिचं म्हणणं जाणून घेऊन पुढील चौकशी करत आहेत.