मुंबई : रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रातील दरांचे सर्व समीकरणं मोडित काढल्यानंतर कंपनी आता डीटीएच क्षेत्रात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर जिओच्या सेट टॉप बॉक्सची काही फोटो व्हायरल झाली आहेत.


दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने पाऊल ठेवल्यानंतर डेटा दर आणि व्हॉईस कॉलिंग दर कमी करण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यानंतर आता डीटीएच क्षेत्रात रिलायन्सने पाऊल ठेवल्यानंतर अशीच स्पर्धा पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते.

काय आहे व्हायरल मेसेज?

रिलायन्स जिओच्या लोगोसह सेट टॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. जिओच्या डीटीएच सेवेत 360 चॅनल्स असतील, त्यापैकी 50 चॅनल्स एचडी असतील, असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.

डेटाप्रमाणेच जिओ डीटीएच सेवाही सर्वात स्वस्त दरात देणार असल्याची चर्चा आहे. 450 रुपये या सेट टॉप बॉक्सची किंमत असेल, पहिल्या सहा महिन्यांसाठी 360 चॅनेल्स मोफत पाहता येतील, त्यानंतर 360 चॅनल्ससाठी 120 रुपये प्रति महिना या दराने पैसे माजावे लागतील, असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान जिओने यापूर्वीही डीटीएच क्षेत्रात येण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे लवकरच जिओची ही सेवा मुंबईतून सुरु होऊ शकते, असं बोललं जात आहे.

दूरसंचार क्षेत्रात जिओचा धुमाकूळ

सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4G अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. यानुसार जिओच्या सर्व ग्राहकांना दररोज 1 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.

रिलायन्स जिओने मोफत डेटा सेवा लाँच केल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. यामध्ये अनेक कंपन्यांनी कॉल आणि डेटा दर मोठ्या प्रमाणात कमी केले. जिओला पहिल्या सहा महिन्यातच 10 कोटी ग्राहक मिळवण्यात यश आलं.