मुंबई : व्हॉट्सअॅप या चॅटिंग अॅपच्या माध्यमातून लवकरच डिजीटल पेमेंट करता येणार आहे. वर्षअखेर पर्यंत व्हॉट्सअॅप यूझर्सना ही सेवा वापरता येण्याची शक्यता आहे.


पेटीएम, भीम अॅप, फ्रीचार्ज, मोबीक्विक यासारखी वॉलेट्स किंवा डिजीटल पेमेंट करणारी अॅप्स भारतात लोकप्रिय आहेत. मात्र व्हॉट्सअॅप यांना तगडी टक्कर देण्याची चिन्हं आहेत. पुढील सहा महिन्यात व्हॉट्सअॅपची ही नवी सेवा सुरु होऊ शकते.

यूपीआय (UPI) वर आधारित डिजीटल पेमेंट सेवा सुरु करण्याची तयारी व्हॉट्सअॅपने सुरु केली आहे. व्हॉट्सअॅप आणि एनपीसीआय ( नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. ही सेवा युझर टू युझर बेस्ड असेल, अशी माहिती आहे.

फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सअॅपचे को-फाउंडर ब्रायन अॅक्टन यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली होती. त्यावेळी डिजीटल पेमेंट सर्व्हिसबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. कमर्शियल मेसेंजिंगमध्ये अद्याप प्रवेश केला नसला, तरी याबाबत विचार सुरु असल्याचं त्यावेळी अॅक्टन म्हणाले होते.

व्हॉट्सअॅपच्या दृष्टीने भारत हा अग्रगण्य देश आहे. आतापर्यंत चॅटिंग, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगसोबतच अनेक नवनवी फीचर्स व्हॉट्सअॅपने लाँच केली आहेत. भारतात सुमारे 20 कोटी व्हॉट्सअॅप यूझर्स असल्यामुळे ही मोठी बाजारपेठ ठरु शकते.