नवी दिल्ली : जिओ सिम आणि जिओ मोबाईल लाँच केल्यानंतर रिलायन्स आता मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. जिओ आता सिम कार्ड असणारा लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता आहे. सिम असणारा लॅपटॉप लाँच करुन जिओ आपला सरासरी महसूल वाढवणार आहे.


‘इकॉनमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांची कंपनी चिप मेकर कंपनी क्वालकॉमसोबत विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमचा लॅपटॉप तयार करण्यासाठी चर्चा करत आहे. भारतीय सेल्यूलर कनेक्शनवर काम करणाऱ्या सिस्टमवर ही चर्चा सुरु आहे. यापूर्वीही 4G फीचर फोनसाठी क्वालकॉमने जिओसोबत काम केलेलं आहे.

लॅपटॉप डेटा आणि कंटेट बंडलसोबत दिला जाऊ शकतो. जिओसोबत याबाबत बातचीत सुरु आहे, अशी माहिती क्वालकॉमच्या वरिष्ठ संचालकांनी दिली.

जिओने 2017 मध्ये 4G फीचर फोन लाँच केला होता. हा देशातला पहिलाच 4G VoLTE होता, ज्याची मूळ किंमत शून्य रुपये ठेवण्यात आली होती. दरम्यान, यासाठी अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागत होते. जिओ फोन देशातला सर्वात जास्त विकला गेलेला फीचर फोन आहे.