जिओचा आणखी एक दणका, प्लॅन्सचे दर वाढवले
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2017 12:52 PM (IST)
जिओने रिव्हाईज प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये 84GB डेटा प्लॅनसह इतर प्लॅनच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.
मुंबई : स्वस्त स्वस्त म्हणून मिरवलेल्या रिलायन्स जिओने ग्राहकांना आणखी एक दणका दिला आहे. जिओने रिव्हाईज प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये 84GB डेटा प्लॅनसह इतर प्लॅनच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. जिओ आता 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 4.2 GB डेटा देणार आहे. कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 150MB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 300 मेसेज देणार आहे. 309 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी जिओने कमी केली असून यामध्ये मिळणारा डेटाही कमी केला आहे. या प्लॅनमध्ये अगोदर 56 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जायची, तर आता केवळ 49 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाणार आहे. दररोज 1GB डेटाची मर्यादा देण्यात आली असून अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग असेल. सर्वात लोकप्रिय असणाऱ्या 399 रुपयांच्या प्लॅनची व्हलिडिटीही जिओने कमी केली आहे. हा प्लॅन आता 84 ऐवजी 70 दिवसांसाठीच मिळेल. ज्यामध्ये दररोज 1GB या प्रमाणे 70 दिवसांसाठी 70GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग दिली जाईल. धन धना धन ऑफरचा फायदा घेण्यासाठी आता 459 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. यामध्ये 84 दिवसांसाठी 84GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. दरम्यान जिओने यापूर्वीही महत्त्वाच्या प्लॅन्सच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यामुळे स्वस्त समजल्या जाणाऱ्या जिओकडून ग्राहकांना दर महिन्याला असाच दणका दिला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.