नाशिक : गुगल मॅपवर तुम्ही रस्ते, ट्राफीकची माहिती सहज मिळवता. तशीच भविष्यात कुठल्या रस्त्यावर किती खड्डे आहे, याची माहिती तुम्हाला मोबाईल अॅपवर मिळू शकणार आहे. ‘इस्त्रो’ने रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देणारं अॅप बनवण्याचं काम सुरु केलं आहे. देशातला पहिल्या रस्त्यांचं मॅप तयार करण्याचा प्रयोग नाशिकमध्ये इस्त्रोने सुरु केलाय.


देशातला पहिला प्रयोग नाशिकमध्ये

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची वस्तूस्थिती जाणून घेण्याचं काम इस्त्रोने सुरु केलं आहे. सिन्नरमधल्या नायगाव गटातील ब्राम्हणवाडे येथून मोबाईल कॅमेरा अॅपद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या सर्वेक्षणाचं काम सुरु करण्यात आलं. पहिल्याच दिवशी 93 किमी रस्त्याचं सर्वेक्षण पूर्ण केलं. देशातला हा पहिलाच प्रयोग असून भविष्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांची आणि रस्ते कामांची पारदर्शक माहिती या अॅप्लीकेशनद्वारे नागरीकांना, प्रशासनाला सहज मिळेल, असं गोडसेंनी सांगितलं.

मोबाईलमधील एक्सीलरोमीटर, गायरोस्कोप आणि कॅमेरा यांच्या माध्यमातून रस्त्यांचं सर्वेक्षण केलं जाईल. यात रस्त्यावर एकूण किती खड्डे आहेत, कुठला खड्डा किती मोठा आहे, किती खोल आहे, याचीही माहिती घेतली जाईल. अॅप्लीकेशन मॅपवर मोठा खड्डा लाल, मध्यम खड्डा निळ्या तर लहान खड्डा इतर रंगात दाखवला जाईल, असं फॉरमॅट तयार करण्यात आलं आहे.

सरकारी यंत्रणा अॅपचा वापर करुन घेणार?

वाहनचालकांना याचा लाभ होईलच. पण प्रशासनाला, सरकारलाही हे अॅप्लीकेशन फायदेशीर ठरेल. खरंच कुठल्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, कुठल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या कामांना परवानगी देणं गरजेचं आहे. काम देण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यावर रस्त्यांवरच्या खड्ड्यांची स्थिती काय आहे, याचा सत्य पुरावा या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून मिळणार असल्याने रस्ते कामांतला भ्रष्टाचारही यामुळं रोखला जाईल. शिवाय वशिल्यावर नाही, तर गरजेनुसार रस्त्यांची कामं केली जातील, असं गोडसेंनी सांगितलं.

'इस्त्रो'च्या अॅप्लीकेशन विभागाचे प्रमुख डॉ.सुरेश बाबू, सौरभ गंगवार यांच्यासह टीम हे अॅप्लीकेशन बनवण्यासाठी नाशकात तळ ठोकून आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी सरकारला हतबल केलं असताना आता रस्त्यांच्या पारदर्शक कामांसाठी इस्त्रो मदतीला आता धावून आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा सार्वजनिक बांधकाम या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आवश्यक तिथे काम करेन, अशी अपेक्षा आहे.