मुंबई : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) 1 डिसेंबरपासून व्हॉईस कॉलिंग सेवा बंद करणार आहे. त्यामुळे या वर्षाअखेर ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्ककडे वळावं लागणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने याबाबत शुक्रवारी माहिती दिली.


रिलायन्स कम्युनिकेशन 1 डिसेंबर 2017 पासून ग्राहकांना फक्त 4G सेवाच देऊ शकेल. त्यामुळे व्हॉईस कॉलिंग देऊ शकणार नाही, असं आरकॉमने म्हटल्याचं ट्रायने सांगितलं आहे.

आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश (पूर्व आणि पश्चिम), तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या आठ राज्यांमध्ये कंपनीकडून 2G आणि 4G सेवा पुरवली जाते, अशी माहिती आरकॉमने ट्रायला दिली.

कंपनी सध्या विलिनीकरण होणारी कंपनी सिसतेमा श्याम टेलीसर्व्हिसेसचं सीडीएमए नेटवर्क अपग्रेड करत आहे. यामुळे दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश पश्चिम, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात आणि कोलकातामध्ये 4G नेटवर्क उपलब्ध करुन देता येईल, असंही आरकॉमने ट्रायला सांगितलं.

आरकॉमने व्हॉईस कॉलिंग बंद होण्यासोबतच पोर्ट करण्यासंबंधित सर्व सूचना अगोदरच दिल्या आहेत. आरकॉमने कोणतीही पोर्टिंग रिक्वेस्ट रिजेक्ट करु नये, शिवाय इतर कंपन्यांनीही 31 डिसेंबर 2017 पर्यंत आरकॉम ग्राहकांची पोर्टिंग रिक्वेस्ट स्वीकारावी, असे आदेश ट्रायने दिले आहेत.