काठमांडू : जगभरात लोकप्रिय असलेला इंटरनेट गेम 'पबजी'वर कोर्टाच्या आदेशानंतर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या गेममुळे तरुण आणि लहान मुलांच्या वागणुकीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे कोर्टाचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त नेपाळी माध्यमांनी प्रसारित केले आहे. दरम्यान, हा गेम खेळताना सापडल्यास त्या व्यक्तीला अटक केली जाणार आहे. नेपाळमध्ये 'पबजी'वर (PlayerUnknown's Battlegrounds ) बंदी घातल्यानंतर या गेमवर भारतातही बंदी घालण्याची मागणी होत आहे.
नेपाळी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाने (दी नेपाल टेलिकम्युनिकेशन अथॉरिटी) सर्व इंटरनेट आणि मोबाईल सेवा प्रदात्यांना 'पबजी' या गेमवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पबजीवर बंदी घातल्यानंतर कोणतीही व्यक्ती हा गेम खेळताना सापडल्यास त्याला अटक केली जाईल.
महानगरीय गुन्हे शाखेद्वारे काठमांडू जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा गेम खेळल्याने लहान मुलांच्या वागणुकीवर नकारात्मक परिणाम होतात. या मुद्द्याकडे लक्ष वेधत कोर्टाने पबजीवर बंदी घालण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाच्या परवानगीनंतर गुन्हे शाखेने नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाला (एटीए) पत्र लिहून गेमवर बंदी घालण्याची विनंती केली.