मुंबई : प्रसिद्ध सोशल मीडिया साईट फेसबुक जगभरात डाऊन झाली आहे. यासोबतच व्हॉट्सअप, फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्राम यांची सेवाही काही तांत्रिक कारणांमुळे बाधित झाली आहे. युजर्सना हे अॅप्स वापरताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर फेसबुकचा वापर करणाऱ्यांना युजर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र स्मार्टफोनवरुन फेसबुकचा वापर करणाऱ्या युजर्सना फेसबुकमध्ये अडचण येत नसल्याचं समोर येत आहे.


अनेक देशांमध्ये facebook.com साईट सुरु होत नसल्याची बाब समोर आली आहे. फेसबुक मेसेंजरही काही वेळ ठप्प असल्याची तक्रार युजर्सनी केली आहे. इन्स्टाग्राममध्येही अशाच प्रकारच्या अडचणी येत आहेत. तर व्हॉट्सअॅप युजर्सनाही मेसेज पाठवताना अडचणी येत आहेत.


व्हॉट्सअॅपवरुन मेसेज पाठवणाऱ्यांना मेसेज गेल्यानंतर डिलिव्हरी साईनच येत नसल्याची तक्रार युजर्सनी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सकाळपासूनच फेसबुक वापरताना अडचण येत आहे. गेल्या महिन्यातही अशीच समस्या समोर आली होती. त्यावेळीही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप डाऊन झालं होतं. त्यावेळी ही फेसबुकची सेवा पूर्णपणे पुर्ववत होण्यासाठी 24 तासांचा वेळ लागला होता.


मात्र सर्व्हरमध्ये काही बदल केल्याने ही अडचण निर्माण झाली होती, असं स्पष्टीकरण फेसबुकने दिलं होतं. मात्र आज नेमकी समस्या काय आहे यांचं कोणतंही स्पष्टीकरण अद्याप फेसबुककडून आलेलं नाही.