लंडन : पती-पत्नीच्या भांडणानंतर एकमेकांशी अबोला धरणं किंवा कुरबुरी करणं ही तशी सामान्य बाब आहे. ब्रिटनमध्ये मात्र एका तरुणाने चक्क आपल्या पत्नीलाच 'इबे' या ऑनलाईन साईटवर विक्रीला काढलं आहे.


'इबे' वेबसाईटवर 65 हजार 880 पाऊंड म्हणजे सुमारे 58 लाख 25 हजार रुपये इतक्या किमतीची बोली लावण्यात आली आहे. आपण आजारी असताना पत्नीने कोणतीही सहानुभूती न दाखवल्याने आपण हे पाऊल उचलल्याचं सायमन सांगतो.


33 वर्षीय सायमनने 27 वर्षीय लिएंड्राचा फोटो इबेवर टाकला. विशेष म्हणजे 'यूज्ड वाईफ' असं शीर्षक त्याने या जाहिरातीला दिलं. पत्नीच्या विक्रीची कारणं आणि तिला खरेदी करण्याचे फायदे तसंच तोटेही त्याने जाहिरातीत नमूद केले आहेत.


सायमन आणि लिएंड्रा यांना दोन मुलंही आहेत. मात्र पत्नी म्हणून समर्पणाची भावना तिच्यात कमी पडत असल्याचं तो म्हणतो. इतकं असूनही पत्नीच्या पाककौशल्याचं सायमनने मोकळ्या मनाने कौतुक केलं आहे.


वेबसाईटवर तिच्या लिलावाची किंमत दोनच दिवसांत 58 लाखांच्या घरात पोहचल्यानंतर सायमनही थक्क झाला. लिएंड्राला हे समजताच तिला नवऱ्याचा जीव घ्यावासा वाटला.



पत्नीच्या मोबदल्यात एखादी तरुण मॉडेल आल्यास आपण तिचा विचार करु, असंही सायमनने जाहिरातीत निर्लज्जपणे म्हटलं आहे. ब्यूटी थेरपिस्ट लिएंड्राचा पारा मात्र प्रचंड चढला आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांनी ही जाहिरात पाहून आपली खिल्ली उडवल्याचंही ती सांगते. 'मला विकायला तर काढलंच, पण माझा सगळ्यात घाणेरडा फोटो टाकला' असं लिएंड्राने म्हटलं आहे.



'इबे'ने ही जाहिरात हटवल्यानंतर सायमन काहीसा नाराज आहे. आपल्या पत्नीला किती किंमत येऊ शकते, हे आपल्याला पाहायचं होतं, असं तो म्हणतो. मला फक्त लोकांना हसवायचं होतं, माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता, अशी कबुली सायमनने दिली आहे.