मुंबई : व्हॉट्सअॅपचे भारतातील अस्तित्त्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण फेक न्यूजवर निर्बंध आणण्यासाठी व्हॉट्सअॅपने पाऊल उचलण्यासंदर्भात भारत सरकारकडून निर्देश देण्यात आले होते. सरकारने काही सूचनाही व्हॉट्सअॅपला सूचवल्या होत्या. यावर उत्तर देताना व्हॉट्सअॅपने सांगितलं की, "व्हॉट्सअॅप लोकांना वैयक्तिक संवाद साधण्यासाठी बनवण्यात आलं आहे. त्यात बदल करणं कठीण आहे. जर असंच राहिलं तर भारतात व्हॉट्सअॅप सेवा बंद करु."


आम्ही ग्रुपमध्ये 256 लोकांना अॅड करण्याचा पर्याय दिला आहे. मात्र 90 टक्के ग्रुपमध्ये सदस्यांची संख्या दहापेक्षाही कमी आहे. हे अॅप मेसेज पाठवणारा आणि मेसेज वाचणाऱ्या यांच्यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले आहे, असं व्हॉट्सअॅपचे कम्युनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी सांगितलं.

युझर्सचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सर्व्हिस सुरु केली आहे. या सर्व्हिसमध्ये पाठवणारा आणि प्राप्त करणारा व्यक्तीच मेसेज वाचू शकतो. व्हॉट्सअॅपही हे मेसेज वाचू शकत नाही. म्हणून एंड-टू-एंड सर्व्हिस आम्ही बंद करु शकत नाही, असं स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आलं आहे.

भारतात एकूण 20 कोटी व्हॉट्सअॅप युझर्स आहेत. भारतामध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुकलाही व्हॉट्सअॅपने मागे टाकले आहे. भारतामध्ये व्हॉट्सअॅप युझर्सची संख्या फेसबुकपेक्षा जास्त असल्याचं एका अहवालात नमूद करण्यात आलं होतं. मात्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फेक न्यूज पसरवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात केलं जातं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे.

यापूर्वी फेक न्यूज थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून फॉरवर्ड केला जाणारा मेसेज फक्त पाच जणांना पाठवू शकतात, अशी तरतूद करण्यात आली होती. या फिचर्सचा मोठ्याप्रमाणात भारतात फायदा झाल्याने व्हॉट्सअॅपकडून अन्य देशातही हे फिचर्स सुरु करण्यात आले होते.