नवी मुंबई : रिलायन्स जिओच्या 12 कोटी ग्राहकांचा डेटा हॅक केल्याप्रकरणी राजस्थानमधील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. Magicapk.com या वेबसाईटवरुन जिओच्या ग्राहकांचा डेटा हॅक करण्यात आला होता, त्यानंतर या वेबसाईटला तातडीने सस्पेंड करण्यात आलं.
पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव इमरान चिमप्पा असल्याची माहिती आहे. राजस्थान पोलिसांनी या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा विद्यार्थी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
Frendz4m वेबसाईटवर 5 जुलैला चिमप्पाच्या प्रोटोकॉलहून 'imranchhimpa' या अकाऊंटवरुन पोस्ट टाकण्यात आली. ज्यामध्ये असं सांगितलं होतं की, आम्ही तुम्हाला जिओच्या ग्राहकांची वैयक्तीक माहिती उपलब्ध करुन देऊ शकतो. याच आयपी अॅड्रेसच्या मदतीने पोलिसांनी चिमप्पाला अटक केली.
काय आहे प्रकरण?
रिलायन्स जिओ यूझर्सचा डेटा हॅक केल्याचा दावा एका वेबसाईटने केला होता. ‘Magicapk’ या वेबसाईटवर जिओ यूझर्सचा डेटा हॅक झाल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर या वेबसाईटला रिपोर्ट करुन सस्पेंड करण्यात आलं.
हॅकिंगनंतर जिओचं स्पष्टीकरण
जिओच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, “या वेबसाईटवर असणारा डेटा अधिकृत नाही. यासंदर्भात सर्व माहिती आम्ही कायदेशीर कारवाईसाठी संबंधित यंत्रणांना दिली आहे.”
“वेबसाईटकडून करण्यात हॅकिंगचा दावा खोटा आहे. आम्ही या सर्व प्रकाराची चौकशी करत आहोत. आतापर्यंतच्या चौकशीनुसार वेबसाईटकडून खोटा दावा करण्यात आला आहे. जिओच्या यूझर्सचा डेटा सुरक्षित असून, गरजेच्या ठिकाणीच वापर केला जातो. त्यामुळे या वेबसाईटविरोधात कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणार आहोत.”, असंही जिओच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.
‘फोन एरिना’ या टेक वेबसाईटचे प्रमुख वरुण कृष्णन यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती की, “जिओच्या 12 कोटी यूझर्सचा डेटा लीक झाला असून, हे भारतातील आतापर्यंत सर्वात मोठं हॅकिंग ठरु शकतं.”