मुंबई : म्हातारपण हे दुसरं बालपण आहे, असं म्हटलं जातं ते काही उगाच नाही. 85 वर्षांच्या एका आजीबाईंनी गुगलवर शोधाशोध करताना केलेलं सर्च नेटिझन्सच्या मनात घर करुन गेलं आहे.
यूकेमध्ये राहणाऱ्या बेन जॉन नावाच्या युवकाने आपल्या आजीचा लॅपटॉप काही कारणासाठी घेतला. तेव्हा गुगल सर्चमध्ये 'प्लीज mcmxcviii या रोमन आकड्यांचं भाषांतर करा. धन्यवाद' असं दिसलं. हे पाहून त्याला आजीचा साधेपणा भावला आणि ट्विटरवरुन शेअर केल्याविना त्याला राहावलं नाही.
'माझ्या आजीने गुगल सर्च करताना प्लीज आणि थँक यू यासारखे शब्द वापरल्याने मला हसू आवरत नाहीये' असं बेनने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. गेल्या आठवड्यापासून या ट्वीटला 5 हजारांहून अधिक रिट्वीट्स आणि 8 हजार शेअर्स मिळाले आहेत.
बेनच्या आजीच्या विनम्रपणामुळे अनेक ट्विटराईट्सचं मन हेलावलं आहे. इतकी गोड आजी मिळाल्याबद्दल अनेकांनी बेनचा हेवा वाटत असल्याचंही म्हटलं आहे.