मुंबई : ट्रेनच्या किंवा बसच्या प्रवासात पाकीट गहाळ झाल्याचं आपण अनेकदा ऐकतो. एकदा की पाकिट चोरीला गेलं की आपणही ते कायमचं हरवलं असं समजून शोधणं बंद करतो. यामुळे अनेकदा आपले महत्वाचे काही कागदपत्र, पैसे आपण कायमचे गमावून बसतो. या सगळ्याचाच विचार करुन आता व्होलटरमॅन या कंपनीनं चक्क Smart Wallet लाँच केला आहे.

हे पाकीट खऱ्या अर्थानं स्मार्ट आहे. कारण त्यात अनेक भन्नाट फीचरही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता तुमचं पाकीट हरवलं तरी काळजी करण्याचं कारण नाही. समजा, एखादा चोरानं तुमचं हे स्मार्ट पाकीट लांबवलंच तर तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक तात्काळ अलर्ट येईल. हा अलर्ट पाहताच तुमचं पाकीट आता कुणाकडे आहे आणि ती व्यक्ती कुठं आहे हे देखील तुमच्या मोबाइलवर गुगल मॅपच्या माध्यमातून दिसणार आहे.

त्यामुळे तुम्ही त्या चोराला सहजपणे गाठू शकतात. ते पाकीट उघडून पाहताच चोराचे फोटो पाकीटातील छुप्या कॅमेऱ्यात कैद होईल आणि ते तुमच्या मोबाइलवर दिसू लागतील. त्यामुळे तुम्ही पोलिसातही त्या व्यक्तीची थेट तक्रार नोंदवू शकतात.


फक्त छुपा कॅमेरा आहे म्हणून याला Smart Wallet म्हटलेलं नाही. तर यामध्ये त्याशिवायही भन्नाट फिचर आहेत.

Smart Wallet मधील खास फीचर्सवर एक नजर :

- या पाकिटात तुम्हाला चक्क वाय-फायही मिळणार आहे.

- Smart Wallet मधून तुम्ही मोबाइलही चार्ज करु शकतात. फक्त वायर चार्जिंगच नाही तर वायरलेस चार्जिंगही करता येईल.

- यासाठी एक खास पॅनल या पाकिटात बसवण्यात आलं आहे.

त्यामुळे आता स्मार्टफोनप्रमाणे तुम्ही Smart Wallet काही दिवसातच वापरु शकतात.