नवी दिल्ली: आता पर्यंत पेटीएमचा वापर खरेदीसाठी किंवी पेमेंटच्या ट्रान्सफरसाठी करण्यात येत होता. पण आता पेटीएमने आपल्या सेवेत विस्तार केला असून त्याद्वारे केवळ दोन मिनीटात दोन लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे पेटीएमची ही सेवा वर्षातील 365 दिवस आणि 24 तास सुरु राहणार आहे.
जर आपल्याला रविवारी किंवा सणाच्या काळात कर्ज हवं असेल तर त्याची चिंता पेटीएमने दूर केली आहे. त्या माध्यमातून पेटीएम ग्राहकांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज देणार आहे. या व्यक्तिगत कर्जाची भरपाई करण्यासाठी ग्राहकांना 18 ते 36 महिन्यांच्या EMI चा पर्याय उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी पेटीएमने अनेक बँका आणि एनबीएफसी सोबत करार केला आहे.
गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा Paytm आलं, का हटवलं होतं पेटीएम?
कसं मिळणार कर्ज
पेटीएमच्या अॅपमध्येच एक पर्सनल लोन नावाचा पर्याय उपलब्ध असणार आहे आणि त्यातूनच आपल्याला कर्जासाठी अॅप्लाय करता येणार आहे. कर्जाचा परतावाही याच अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया संपूर्णत: डिजिटल स्वरुपाची असणार आहे. हे कर्ज बँक आणि एनबीएफसीतर्फे देण्यात येणार असून पेटीएम केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मच्या भूमिकेत कार्य करणार आहे.
सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध
हे कर्ज कोणाला मिळणार?
नोकरी करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त लहान व्यापारी आणि व्यावसायिकांना हे कर्ज उपलब्ध होणार आहे. क्रेडिट स्कोर आणि खरेदी करण्याच्या पॅटर्नच्या आधारे हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एकदा कर्ज उपलब्ध करुन दिल्यानंतर ग्राहक आपल्या सोईनुसार EMI चा कालावधी निवडू शकणार आहे.
या नव्या कल्पनेमुळे एका बाजूला बँका आणि एनबीएफसी यांना नवीन ग्राहक उपलब्ध होणार असून दुसऱ्या बाजूला पेटीएमलाही त्याचा फायदा होणार आहे.
भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च; Google Pay आणि Paytm देणार टक्कर