नवी दिल्ली : योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने आता दूरसंचार क्षेत्रातही एंट्री केली आहे. बीएसएनएलसोबत भागीदारी करत पंतजलीने सिम कार्ड लाँच केलंय, ज्याला स्वदेशी समृद्धी सिम कार्ड असं नाव देण्यात आलं आहे. हे सिम सध्या केवळ पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल.
या सिमला 144 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. शिवाय या सिमधारकांना पंतजलीच्या वस्तूंवर दहा टक्के सूट मिळणार आहे. विशेष म्हणजे सिमधारकांना अडीच लाख रुपयांचा वैद्यकीय विमा आणि पाच लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात येणार आहे.
बीएसएनएल आणि पतंजली हे दोन्ही भारतीय ब्रँड आहेत. दोन्ही ब्रँडचं लक्ष्य देशाची सेवा करणं आहे. या सिमद्वारे केवळ डेटा आणि कॉलिंग सुविधाच नाही, तर वैद्यकीय सुविधा देणंही आमचं ध्येय आहे, असं रामदेव बाबांनी सांगितलं.
सिम कार्डची वैशिष्ट्य
पतंजलीच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून सिम मिळणार
144 रुपयांच्या रिचार्जमध्ये 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा
पंतजलीच्या वस्तूंवर दहा टक्के सूट
सिमधारकांना अडीच लाख रुपयांचा वैद्यकीय विमा आणि पाच लाख रुपयांचा जीवन विमा
विम्याची रक्कम फक्त रस्ते अपघातातील व्यक्तींनाच मिळणार