नागपूर: एकीकडे पाकिस्तानी लष्करानं आणि दहशतवाद्यांनी भारताविरुद्ध जमिनीवर अघोषीत युद्ध पुकारलं आहे, तर दुसरीकडे आणखी एक आर्मी भारताविरुद्ध व्हर्च्युअली लढतेय. तिचं नाव आहे, पाकिस्तानी सायबर आर्मी.
एखादी घटना भरतात घडली... की भारताविरोधात, व्यवस्थेविरोधात या आर्मीद्वारे शंभर दीडशे ट्विट टाकले जातात... त्याला म्हणतात ट्विटर डम्प... आणि हेच डम्प 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहेत.
मग वेगवगेळ्या ठिकाणी बसलेले त्यांचे सायबर आर्मीचे एजेंट्स कामाला लागतात. त्यांना कुठलाच ट्विट बनवायचा नसतो. सर्व ट्विट्स आधीच ह्या डम्पमध्ये असतात. त्याचबरोबर पुढे काय करायचे याच्या पद्धतशीर सूचना सुद्धा ह्याच डम्पवर दिलेल्या असतात.
डम्पवरील सूचना
*काश्मीर स्टँडर्ड टाईम 6 वाजून 20 मिनिटे आणि ब्रिटीश स्टँडर्ड टाईम 2 वाजेपर्यंत ट्विट करु नये
*ट्विट्स कॉपी पेस्ट करावे, रिट्विट करू नये
*रिट्विट केल्यास हॅशटॅग ट्रेन्ड होणार नाही
*इतर ट्विट्समध्ये #KASHMIRKILLINGS हे नक्की लिहावे
*पाच मिनिटाच्या आत दोन ट्विट्स टाकू नये
आणि मग सुरु होतो द्वेषाचा खेळ... या आर्मीत काम करणारे हे काश्मीर किंवा इंग्लंडमधले असल्यानं त्यांच्या वेळाही ठरवून देण्यात आल्या आहेत.
अशा आंतराष्ट्रीय संघटना किंवा शक्तिशाली व्यक्तींना टॅग केले की हे ट्विट्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होते. त्यामुळे हे शास्त्र सुद्धा ही सायबर आर्मी वापरत आहे
या ट्विटर आर्मीचा तपास आता भारतीय गुप्तचर खात्याने सुरु केला आहे. पण त्यासाठी ट्विटरवर ते अवलंबून राहू शकत नाहीत. कारण त्यासाठी किमान 3 वर्षांचा कालावधी लागेल. यातले काही ट्विटर अकाऊंट्स तर रोबोटिक आहेत.
पाकिस्तान सायबर आर्मीचे एजंट्स डम्पमधून ट्विट करतात, तेव्हा अनेकांनी एकत्र ट्विट केल्यामुळे ते खरेच ट्रेंड होत असल्याचा भास निर्माण होतो. जर याचा तपासही करण्यात आला, तरी वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या व्यक्तींनी हे ट्विट केले आहे, असे वाटते. मात्र अजून पुढे अभ्यास केला की या अकाउंट्सचे लोकेशन मिळत नाही. आणि डम्प हाती लागेपर्यंत हे सर्व एक षडयंत्र आहे हे उमजणे कठीण होते.
धक्कादायक गोष्ट ही, की या पाकिस्तानी सायबर आर्मीमध्ये भारतातलेही काही जण सामील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या रणांगणात लढणाऱ्या आपल्या आर्मीला आता आभासी जगातल्या पाकिस्तानच्या आर्मीशीही लढावं लागणार आहे.
सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर