उस्मानाबाद : कानून के हात लंबे होते है असं आपण अनेक वर्षापासून ऐकतोय.. माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करुन उस्मानाबाद पोलीसांनी हे खरे करुन दाखवले आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीच्या वेबसाईटहून खरेदी झालेल्या एका जयपुरी कुर्त्यावरून पोलिसांनी सहा महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावला आहे.


 

२१ डिसेंबरला २०१५ ला उस्मानाबादच्या वाघोलीत एका विहिरीत एक तरुण मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही मुलगी कुठली, तिचा खून कुणी आणि का केला हे सर्व प्रश्न अनुत्तरीत होते. मयत मुलीच्या पोटावर मानेवर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या. तिच्या अंगावरील कपड्यावरून ती उस्मानाबादची नसावी असा पोलिसांनी अंदाज होताच. सुरुवातीला पोलीसांना काहीच धागेदोरे मिळत नव्हते.

 

सहायक पोलीस अधीक्षक तिलक रोशननी मुलीच्या अंगातील जयपुरी कुर्त्याच्या लेबलवरून तो कुर्ता कुठं तयार करतात याची माहिती मिळवली. असे कुर्ते राजस्थानात तयार करून फ्लिपकार्टहून विक्री होतात हे  समजलं. पण त्याच काळात फ्लिपकार्टवरून असे अनेक कुर्ते देशभरात विकले गेले होते.

 

पोलिसांनी मग  फ्लिपकार्टहून हा कुर्ता खरेदी केलेल्या सर्वांचे मोबाईलचे लोकेशन ट्रेस केलं. ग्राहकांचे फेसबुक अकाऊंट शोधले. त्यापैकी एका फेसबुक अंकाऊंटवरचा नंबर वाघोली जवळ ट्रेस झाला. त्यावरून पुढे तपास करत पोलिसांनी तीघांना अटक केले आहे.

 

आरोपी प्रकाश चाफेकर आणि मयत कांचन परदेशी यांच्यात प्रेम संबध होते. पुण्याच्या एका आयटी कंपनीत दोघे नोकरीला होते. आधीच विवाहित प्रकाशच्या मागे कांचनने लग्नासाठी गळ घातल्यावर प्रकाशने मित्राच्या मदतीने कांचनचा खून केल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान जुलै २०१५ ला कांचन परदेशी हरवली असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी येरवडा भागातील पोलीस स्टेशनला दिली होती.