मुंबई : डिजिटल कॅमेरे बनवण्याच्या व्यावसायात पहिल्यासारखा फायदा राहिलेला नाही, हे कुणा व्यवसाय तज्ञाचं विश्लेषण किंवा भाकित नाही तर जगातील सर्वोत्तम कॅमेरे बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑलिम्पस या कॅमेरा कंपनीचं म्हणणं आहे. ऑलिम्पस या डिजिटल कॅमेरा कंपनीने तब्बल 84 वर्षे उत्तमोत्तम कॅमेऱ्यांची निर्मिती केल्यानंतर आता या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. ऑलिम्पस आता डिजिटल कॅमेरे बनवणार नाही. या शतकातील एक असलेल्या स्मार्टफोन क्रांतीचा एक परिणाम म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चांगल्या कॅमेऱ्याशिवाय स्मार्टफोन ही कल्पनाच करवत नाही, त्यामुळे आता कोण कशाला डिजिटल कॅमेरे विकत घेईल.
ऑलिम्पसला गेल्या तीन वर्षांपासून तोटा सहन करावा लागतोय. स्मार्टफोनच्या वाढत्या प्रभावामुळे विक्रीत सातत्याने होणारी घट आणि पर्यायाने होणारा तोटा यामुळे 84 वर्षांची देदीप्यमान कारकीर्द आता इतिहासजमा होणार आहे.
सुरवातीच्या काळात मायक्रोस्कोप निर्मितीतील आघाडीची कंपनी असलेल्या जपानी ऑलिम्पसने 1936 मध्ये पहिल्यांदा कॅमेरा बनवला. ऑलिम्पसने बनवलेल्या या पहिल्या कॅमेऱ्याची बाजारातील तेव्हाची किंमत ही जपानच्या सरासरी मासिक पगाराएवढी होती. या कॅमेऱ्याला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ऑलिम्पसने कॅमेरा निर्मिती हाच मुख्य व्यवसाय बनवला. गेली कित्येक वर्षे कॅमेऱ्याच्या सर्वोत्तम ब्रँडमध्ये ऑलिम्पसची गणना होत आलीय.
1970 च्या दशकात ऑलिम्पस कॅमेरे लोकप्रियतेच्या शिखरावर होते. अनेक सेलिब्रिटी आणि नावाजलेल्या फोटोग्राफर्सनी या कॅमेऱ्याच्या जाहिराती करुन त्याच्या वापराला आपली पसंती दिली होती. त्यानंतर ऑलिम्पसने खास मध्यमवर्गींयासाठी आणि हौशी फोटोग्राफर्ससाठी मिररलेस कॅमेऱ्यांची निर्मिती केली. व्यावसायिक फोटोग्राफर्सशिवाय सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला आणि फोटो काढण्यास फारसा किचकट नसलेला असा हा कॅमेरा होता.
फोटोग्राफीसारखी कला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या या मिररलेस कॅमेऱ्यांची जागा आता स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यांनी कधी घेतली. स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यांनी छायाचित्रण कलेचं लोकशाहीकरण केलं आहे. ज्याच्या हातात स्मार्टफोन तो फोटोग्राफर बनला.
जवळपास प्रत्येक, अगदी बेसिक फोनमध्येही कॅमेरा येऊ लागल्यामुळे आता स्टँड अलोन म्हणजे स्वतंत्र डिजिटल कॅमेरा विकत घेणाऱ्यांची संख्या खूपच रोडावलीय. याचा फटका ऑलिम्पसच्या व्यवसायाला बसला. एका आकडेवारीनुसार 2010 ते 2018 या फक्त आठ वर्षात डिजिटल कॅमेऱ्यांच्या विक्री तब्बल 84 टक्क्यांनी घसरली.
डिजिटल कॅमेऱ्यांची निर्मिती थांबवण्याच्या या निर्णयाचा ऑलिम्पसच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, ऑलिम्पसच्या या निर्णयावर सोशल मीडियातूनही ते मत मांडत आहेत. काही जाणकारांच्या मते, स्मार्टफोन तंत्रज्ञानाचं आक्रमण होत असताना ऑलिम्पसच्या व्यवस्थापनाने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने त्यांना या बाजार स्पर्धेत टिकता आलं नाही.
ऑलिम्पसने डिजिटल कॅमेरा निर्मिती थांबवली असली तरी, ऑलिम्पसची प्रमुख उद्योग असलेली मायक्रोस्कोप निर्मिती सुरुच राहणार आहे. म्हणजेच ऑलिम्पस कॉर्पोरेशन बंद पडणार नाही, तर फक्त या कंपनीचे कॅमेरे आता मिळणार नाहीत. मात्र या डिजिटल कॅमेऱ्यांनीच ऑलिम्पसला जगभरात एक ओळख मिळवून दिली होती.