नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलेल्या पैलवान साक्षी मलिकचं नुकतंच भारतात भव्य स्वागत करण्यात आलं.


 

या स्वागतानंतर हरियाणा सरकारने साक्षी मलिकचा जंगी सत्कार केला. हरियाणा सरकारने साक्षीला 2.5 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं, तसंच 'मुली वाचवा, मुली शिकवा' अभियानाचं ब्रँड अॅम्बेसेडरही केलं.

 

मात्र यानंतर साक्षीने थेट सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवरुन टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्याची वेळ मागितली होती.

 

“गुड मॉर्निंग सर, मला तुम्हाला भेटायचंय. प्लीज, मला वेळ सांगा. तुम्हाला भेटणं कधी शक्य आहे, आज की उद्या?”, असं ट्वीट करुन साक्षी मलिकने विरेंद्र सेहवागला भेटण्याची विनंती केली.


 

त्यानंतर विरेंद्र सेहवागने साक्षीचा ट्वीट कोट करुन आपल्या अस्सल स्टाईलमध्येच उत्तर दिलं.



 

साक्षीला उत्तर देताना सेहवाग म्हणाला, “नक्कीच. मी तुला भेटीची वेळ कळवेन. पण आशा करतो की, आपल्या भेटीनंतर तू माझ्यासोबत कुस्ती सुरु करणार नाहीस”

 

त्यानंतर ठरल्याप्रमाणे सेहवाग आणि साक्षीची भेट झाली. या भेटीनंतरही सेहवागने हटके ट्विट केलं.

 

सेहवाग म्हणाला, "साक्षी मलिकशी भेट झाली. तिने माझ्याशी कुस्ती न खेळल्यामुळे मी निवांत भेटू शकलो आणि देशाची मान अभिमानाने उंचावल्यामुळे तिचं अभिनंदनही करु शकलो".


यानंतर साक्षीनेही ट्विट करुन या भेटीबद्दल सेहवागचे आभार मानले. साक्षी म्हणाली,"सर भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खरंच महान आहात"



यापूर्वी सेहवागने भारतीय पदकांवरून खिल्ली उडवणाऱ्या इंग्लंडच्या प्रसिद्ध पत्रकारालाही खास स्टाईलने उत्तर दिलं होतं.



ब्रिटीश पत्रकार पीरस मार्गनने रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने केलेल्या प्रदर्शनावर टीकेची झोड उठवणारे ट्वीट केले. त्याने आपल्या ट्वीटमध्ये, 120 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाने ऑलिम्पिकमध्ये 2 पराभवाची पदके मिळवली. त्याचा किती मोठा जल्लोष करत आहेत? हे सर्वात दुर्दैवी आहे, असं म्हटलं होतं.



सेहवागने मॉर्गनच्या या ट्वीटला आपल्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कोणत्याही लहान गोष्टीचा आनंद जल्लोषात साजरा करतो. पण तिकडे इंग्लंड क्रिकेटचा जन्मदाता असूनही अद्याप विश्वचषक जिंकू शकलेला नाही. पण तरीही हा संघ क्रिकेट खेळतो, हे दुर्दैवी नाही का? असा प्रश्न त्याने मॉर्गनला विचारला आहे.