मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्त साधत दूरसंचार कंपनी रिलायन्सने आज जिओ फोन 2 च्या पहिल्या फ्लॅश सेलचं आयोजन केलं. आज दुपारी 12 वाजता जिओ फोन 2 च्या सेलला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच जिओ फोन 2 ची विक्री झाली. जिओचा हा नवा हायएंड फोन jio.com वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
जिओ फोन 2 हा मागील वर्षी लॉन्च झालेल्या जिओ फोनचं अपग्रेडड व्हेरिएंट आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे Qwerty कीबोर्ड आणि हॉरिझेंटल डिस्प्ले असेल. जिओने प्रत्येक भारतीयाला डिजिटल युगाचा अनुभव देण्यासाठी हा स्वस्त फोन लाँच केला आहे. जिओ फोन 2 ची किंमत 2999 रुपये आहे. या फोनमुळे जिओ फोन वापरणाऱ्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे जाईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.
जिओ फोन 2 मध्ये फेसबुक, यूट्यूब आणि गुगल मॅप यांसारख्या सुविधा मिळतील. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप असेल, असाही दावा कंपनीने केला आहे. यापूर्वीही जिओने ग्राहकांना मोफत कॉलिंग, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ चॅट यांसारख्या सुविधा दिल्या आहेत. आता जियो फोन 2 चा सेल 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजता सुरु होईल.
जिओ फोन 2 ची वैशिष्ट्ये
- 2.4 इंचाची स्क्रीन आणि QWERTY कीपॅड
- 512 MB रॅम आणि 4 GB इंटरनल मेमरी
- SD कार्डने 128 GB पर्यंत एक्स्पांड करता येऊ शकते
- जिओ फोन 2 मध्ये 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- व्हिडीओ कॉलिंगसाठी 0.3 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- KAI OS ऑपरेटिंग सिस्टम
- 2000 mAh बॅटरी
- 4G VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, एनएफसी आणि एफएम