व्हॉट्सअॅप वरील संभाषण आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने लवकरच व्हॉट्सअॅपकडून 'फिंगरप्रिंट लॉक' हे फिचर आणण्यात येणार आहे. या फिचरमुळे आपल्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.

व्हॉट्सअॅपवरील संभाषण सुरक्षित ठेवण्याच्या  दृष्टीने हे फिचर आणण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या अनेक जण आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप  लॉक करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करतात. मात्र व्हाट्सअॅपच्या या नवीन फिचरमुळे थर्ड पार्टी अ‌ॅप्स वापरण्याची गरज पडणार नाही.

यासोबतच इतरही काही फिचर्स व्हॉट्सअॅपकडून आणली जाणार आहेत.

फिंगरप्रिंट लॉक
व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येतो.  मात्र अनेकदा आपला मोबाईल फोन दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले व्हॉट्सअॅप मेसेजेस वाचले जाण्याची भिती अनेकांना असते. फिंगरप्रिंट लॉक या फिचरमुळे आता परवानगी शिवाय व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही. मोबाईल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होणार आहे.

डार्क मोड
व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड युजर्स साठी लवकरच 'डार्क मोड'चं अपडेट येणाची शक्यता आहे.  डार्क मोड मुळे रात्रीच्या वेळी मोबाईल वापरताना डोळ्यांना त्रास कमी होतो तसेच मोबाईलच्या बॅटरी लाईफवरही याचा चांगला परिणाम होतो.

3D टच अॅक्शन
आयफोन युजर्ससाठी हे फिचर असणार आहे. या फिचरमुळे एखाद्याला न कळत त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहता येणार आहे.

स्टिकर इन्टिग्रेशन
गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपनं स्टिकरचं नवीन अपडेट आणल्यानंतर ते प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. आता लवकरच व्हॉट्सअॅप 'स्टिकर इन्टिग्रेशन' फिचर आणणार आहे. या फिचरमुळे युजर्सना स्टिकर पाठवण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरुन व्हॉट्सअॅपवर स्टिकर पाठवता येणार आहे.

ऑडिओ पिकर
व्हॉट्सअॅपवर सध्या ऑडिओ मेसेज पाठवायचा असल्यास तो रेकॉर्ड केल्यानंतर पाठवण्याआधी ऐकण्याची सोय नाही. या नव्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवरून एखादा ऑडिओ मेसेज पाठवताना रेकॉर्ड केल्यानंतर तो ऐकता येणार आहे.  आपल्या मोबाईल फोनवरील ऑडिओ किंवा म्यूजिक फाईल्सची यादी अॅपमध्ये दिसेल. तसेच एकाच वेळी 30 ऑडिओ फाईल्स पाठवता येणार आहे.