मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट मिंत्राला एका ग्राफिक्समुळं बरीच टीका सहन करावी लागते आहे. सोशल मीडियातून मिंत्रावर मोठ्या प्रमाणात टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत.

 

श्रीकृष्णाच्या ग्राफिक्स जाहिरातीमुळे मिंत्रावर अनेकजण नाराज आहेत. द्रौपदीला वस्त्रहरणमधून वाचविण्यासाठी श्रीकृष्ण हा मिंत्राच्या वेबसाईटवरुन साड्या खरेदी करतो आहे. असं या ग्राफिक्समध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे मिंत्रावर टीकेचा भडीमार सुरु आहे.

 

स्कॉल ड्रॉल नावाच्या एका वेबसाईटनं फेब्रुवारी महिन्यात एक आर्टवर्क रिलीज केलं होतं. यावर सोशल मीडियातून लोकांनी प्रचंड राग व्यक्त केला. या ग्राफिक्समध्ये मिंत्राचा उल्लेख असल्यानं मिंत्रावर बहिष्कार टाका असंही आवाहन सोशल मीडियातून करण्यात आलं.

 

शुक्रवारी #BoycottMyntra हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. हा वाद वाढत असल्याचं पाहून स्कॉलड्रॉल वेबसाईटनं याची जबाबदारी स्वीकारली. यामध्ये मिंत्राची काहीही भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 

पण तरीही यूजर्स मिंत्रावर नाराज आहेत. तसेच त्यांनी स्कॉलड्रॉलवरही कारवाईची मागणी केली आहे.