मुंबई : मोटो जी या मोटोरोलाच्या सर्वाधिक लोकप्रिय सीरिजमधील पुढील व्हर्जन म्हणजेच मोटो जी 4 याच महिन्यात लाँच होणार आहे. एवढंच नाही तर मोटो जी 4 सोबतच मोटो जी प्लस हे नवं व्हर्जनही लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी मोटो जी 3 आणि पाठोपाठ मोटो जी टर्बो हे नवीन व्हर्जन लाँच केलं होतं.

 

 

मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचे स्मार्टफोन असतील.

 

 

मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही व्हर्जन याच महिन्यात म्हणजे 17 मे रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मोटोरोलाच्याच एक्स सिरीजमधील नव्या स्मार्टफोनचंही लाँचिंग भारतात होणार आहे. त्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नसली तरी पुढील महिन्यात म्हणजे 9 जून रोजी मोटो एक्स मालिकेतील दोन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होतील.

 

 

मोटो जी 4 किंवा मोटो जी फोर्थ जनरेशन किंवा मोटो जी 2016 असंही मोटो जी च्या नव्या स्मार्टफोनचं नाव असेल. मोटो जी 4 प्लस असं जास्तीचे आणि सुधारीत स्पेसिफिकेशन्स असलेल्या मॉडेलचं नाव आहे. मोटो जी 4 प्लस या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर हा आजवर फक्त हायएन्ड स्मार्टफोन्सपुरतंच मर्यादित असलेलं फीचर असणार आहे.

 

 

विन फ्युचर या टेक्नॉलॉजी साईटच्या रोनाल्ड क्वान्ट यांनी जारी केलेल्या सर्वात अलीकडच्या लीकनुसार, मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही स्मार्टफोन झुबा या आयात-निर्यातीवर लक्ष देऊन असलेल्या ट्रॅकिंग वेबसाईटवर झळकले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही स्मार्टफोन भारतातच तयार झालेले आहेत. दोन्ही स्मार्टफोनच्या पॅकिंग कार्टनवर मेड इन इंडिया असं नमूद करण्यात आलंय. याचाच अर्थ या दोन्ही स्मार्टफोनचं असेंब्लिंग भारतात झालंय.

 

 

17 मे रोजी भारतात लाँच होणाऱ्या मोटो जी4 या स्मार्टफोनमध्ये 2जीबी रॅम, 16 जीबी मेमरी आणि 16 मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे तर मोटो जी 4 प्लस या व्हर्जन मध्ये 3जीबी रॅम, 32 जीबी मेमरी आणि 16 मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे. मोटो जी 4 प्लसचा कॅमेरा लेझर ऑटोफोकस तंत्राने सज्ज असेल तसंच दोन्ही स्मार्टफोनमध्ये एनएफसी म्हणजे 'नियर फिल्ड कम्युनिकेशन' कनेक्टिविटीचा पर्याय असेल.