मुंबई : मोटोरोलाच्या मोटो G4 आणि G4+ या दोन्ही स्मार्टफोनला गूगलच्या लेटेस्ट अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमचं अपडेट मिळायला सुरूवात झाली आहे. अँड्राईडचं लेटेस्ट अपडेट 7.0 नोगाट हे व्हर्जन आहे.
मोटोरोलाची मालकी गूगलकडून चीनी लेनोवोकडे आल्यानंतरही सर्वात आधी अँड्राईट ओएस अपडेट देण्याचा मान मोटो स्मार्टफोन्सनी कायम ठेवला आहे. G4 आणि G4+ या दोन्ही स्मार्टफोन्सला अँड्राईड 7.0 नोगाट अपडेट मिळायला सुरूवात झाल्याची माहिती लेनोवोनेच जाहीर केली आहे.
ब्राझीलमध्ये G4 आणि G4+ या स्मार्टफोन्सला नोगाट अपडेट देण्यासाठी सोक टेस्ट सुरु झाल्याबरोबर भारतात नोगाट अपडेट मिळायला सुरूवात झाली. सोक टेस्ट म्हणजे काही निवडक यूजर्सना हे अपडेट देऊन त्यामध्ये असलेल्या त्रुटी किंवा यूजर्सना नवीन अपडेट वापरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
लेनोवोने अँड्राईड 7.0 नोगाट अपडेटचं नोटिफिकेशन स्मार्टफोन यूजरला आल्यानंतर वायफायच्या सहाय्यानेच आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप असतानाच स्मार्टफोन ओएस अपडेट करण्याचाही सल्ला दिलाय. लेनोवोच्या वेबसाईटवर भारतीय स्मार्टफोन यूजर्ससाठी काही महत्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या आहेत. ज्यांना नोगाट ओएसचं नोटिफिकेशन आलंय त्यांच्यासाठी तसंच ज्यांना नोटिफिकेशन आलेलं नाही त्यांनी अपटेशनसाठी काय करावं याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
अँड्राईड 7.0 नोगाट या अपटेशननंतर स्मार्टफोनमधील मल्टीटास्किंग फिचर्समध्ये सुधारणार असून तुमच्या इंटरनेट डेटा वापरण्यात तसंच बॅटरी खर्ची पडण्यातही बचत होणार असल्याचा दावा लेनोवोने केला आहे.