नवी दिल्ली : रस्त्यावर एकटी जाताना किंवा टॅक्समध्ये एकटी प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा धोका जाणवल्यास महिला केवळ एक बटण दाबून मदत मागू शकतात. महिला सुरक्षा लक्षात घेऊन स्मार्टफोन बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना 1 जानेवारी 2017 पासून असा हॅण्डसेट बनवणं बंधनकारक आहे, ज्यात पॅनिक बटण असेल.

महिला आणि बालकल्याण मंत्रालय आणि माहिती-प्रसारण मंत्रालय यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार, याच आठवड्यात यासंदर्भात नोटिफिशेकन जारी होऊ शकते.

या फीचरमुळे युझरला काही वेळ हे बटण दाबून ठेवावं लागेल, जेणेकरुन कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींना युझर्सच्या लोकेशनची माहिती मिळेल. यूपीए सरकारने बनवलेल्या निर्भया फंडमधून या योजनेला पैसे देण्यात येतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सध्याच्या फोनमध्ये सेफ्टी फीचर कसं अॅड करता येईल, यावर चर्चा सुरु असून योजनेची आखणी सुरु आहे. आम्ही सॉफ्टवेअरवर विचार करत आहोत, जे पॅनिक बटण सारखं काम करेल. युझर्सना सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यावर अशा पद्धतीचं अॅप मोफत मिळेल, याबाबत स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांशी बातचीत सुरु आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक सूचना आल्या होत्या. त्यामध्ये मोबाईल पॅनिक बटण लावण्याचाही समावेश होता.