मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आता नवे नियम लागू केले आहेत. नव्या नियमानुसार मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी अवघे तीन दिवस लागणार आहेत. याआधी मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ लागत होता. ज्यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, जम्मू काश्मीर, आसाम आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अजूनही नंबर पोर्ट होण्यासाठी 15 दिवसच लागणार असल्याचं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने स्पष्ट केलं आहे.


भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नंबर पोर्टचे नवे नियम लागू करण्याआधी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) सेवा 10 ते 16 डिसेंबरपर्यंत बंद केली होती. आजपासून ही सेवा नव्या नियमांनुसार सुरु झाली आहे. नव्या नियमानुसार एकाच सर्कलमधील मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी तीन दिवस लागणार आहेत. तर दुसऱ्या सर्कलमधील नंबर पोर्ट करण्यासाठी पाच दिवसांचा वेळ लागणार आहे.


नवीन नियम 11 डिसेंबरपासून लागू होणार होते, मात्र टेलिकॉम ऑपरेटर्सला टेस्टिंगसाठी अडचणी येत असल्याने यासाठी थोडा उशीर झाला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाची ग्राहकांच्या सुविधेसाठी तपासणी केल्याशिवाय MNP सेवा सुरु करण्यास तयारी नव्हती.


मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी काय कराल?


तुम्हालाही तुमचा मोबाईल नंबर पोर्ट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी युनिक पोर्टिंग कोड (UPC) घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या नंबरवरुन एक टेक्स्ट मेसेज पाठवावा लागणार आहे. PORT त्यानंतर स्पेस देऊन तुमचा मोबाईल नंबर लिहून तो मेसेज 1900 या नंबरवर तुम्हाला पाठवावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर UPC कोड येईल. या कोडसाठी चार दिवसांची मुदत असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या नेटवर्कमध्ये तुमचा नंबर पोर्ट करायचा आहे, त्या नेटवर्कच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला नवीन सिम मिळेत आणि तीन ते पाच दिवसात तुमचा नंबर पोर्ट होईल.