मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने बहुप्रतीक्षित ‘Mi Mix 2s’ स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आधीच्या स्मार्टफोनसारखाच लूक या नव्या स्मार्टफोनलाही देण्यात आला असून, फीचर्समध्ये मात्र बदल करण्यात आले आहेत. अनेक आकर्षक फीचर्स या नव्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले असून, तीन व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे.


किंमती किती?

  • 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज - 34 हजार 200 रुपये

  • 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज – 37 हजार 300 रुपये

  • 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज – 41 हजार 400 रुपये


8 जीबी व्हेरिएंटच्या स्मार्टफोनसोबत एक हजार रुपयांचा वायरलेस चार्जरसुद्धा मोफत दिला जाणार आहे.

‘एमआय मिक्स 2 एस’ स्मार्टफोनचा फ्रंट लूक याआधीच्या ‘एमआय मिक्स 2’ या स्मार्टफोन सारखा आहे. फीचर्समध्ये मात्र काही बदल करण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी 2x झूमसोबत रिअर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. दोन्ही कॅमेरे 12-12 मेगापिक्सेलचे असून, 18:9 च्या आस्पेक्ट रेशोसह 8.99 इंचाचा पूर्णपणे एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा स्नॅपर देण्यात आला असून, फोन सिक्युरिटीसाठी मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याचसोबत फेसलॉकची सुविधाही देण्यात आली आहे.