नवी दिल्ली: गूगल सर्च इंजिनने आता अॅन्ड्रॉईड आणि iOS यूजर्ससाठी आपले नवे व्हिडीओ कॉलिंग अॅप 'गूगल डुओ' सुरु केले आहे. व्हिडीओ कॉलिंगच्या क्षेत्रात या नव्या अॅपला अॅपलच्या फेसटाईम आणि मायक्रोसॉफ्टच्या स्काईपशी सामना करावा लागणार आहे.
या नव्या व्हिडीओ कॉलिंग अॅपची घोषणा आय. ओ डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये गूगलने तीन महिन्यांपूर्वीच केली होती. यामागे व्हिडीओ कॉलिंगमधील अडचणी दूर करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.
गूगल समुहाचे उत्पादन प्रबंधक अमित फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''व्हिडीओ कॉलिंगने दोघांमधील अंतर कमी होते. यासाठी आम्ही एक नवे इंटरफेस डिझाइन तयार केले असून, हे वापरण्यास अतिशय सोपे आहे. भारतातील दुर्गम भागांमध्येही हे अॅप काम करेल अशा दृष्टीने याच्या कनेक्टिव्हिटीचा अधिक विचार केला आहे. त्यामुळे आता व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून जग अधिक जवळ येऊ शकेल.''
डुओची सुरुवात आजपासून झाली असून, पुढील काहीच दिवसांत हे सर्वत्र उपलब्ध असेल. या नव्या सुविधेच्या सुरक्षिततेसाठी याला इनक्रिप्टेड करण्यात आले आहे.