नवी दिल्ली: आता तुम्हाला पोस्ट पेड किंवा प्रीपेडचे सिम कार्ड घेण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागणा नाही. कारण, आधार कार्ड आणि फिंगरप्रिंटच्या मदतीने तुम्ही सिम कार्ड खरेदी करू शकाल. आजपासून सरकारने e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो योर कस्टमर) सेवा सुरु केली आहे. याच्या मदतीने तुम्हाला नवे कनेक्शन घेताना सिमकार्डसाठीचे अॅप्लिकेशन आणि ऑथेंटिकेशन केले जाणार आहे. तसेच या नव्या प्रणालीने मोबईलची सेवाही लवकर सुरु करून मिळणार आहे.


 

e-KYC मध्ये यूजरला आधार कार्ड क्रमांक आणि बायोमॅट्रिक इम्प्रेशन देणे गरजेचे असणार आहे. यूजरने आधार कार्ड दिल्यानंतर, त्याचे नाव आणि पत्ता आदींची माहिती टेलिकॉम कंपनींकडे संग्रहित होणार आहे. त्यामुळे ही प्रणाली सर्व स्टोअरमधून कार्यन्वित होणार असून ग्राहकांना कनेक्शन घेण्यासाठी आपले आधार कार्ड आणि बोटांचे ठसे द्यावे लागणार आहेत.

 

वोडाफोन इंडियाने दूरसंचार विभागासोबत दोन सर्कलमध्ये प्राथमिक परिक्षण केले होते. ही नवी प्रणाली कार्यन्वित झाल्यानंतर वोडाफोन कंपनीचे भारतातील प्रबंध संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल सूद यांनी दूरसंचार विभागाचे आभार मानले आहेत. तसेच डिजिटल इंडियाच्या दिशेमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे म्हटले आहे.

 

e-KYC मार्फत ग्राहक, सेवा देणाऱ्या कंपनी आणि नियामक कंपनी या तिघांनाही याचा फायदा होणार आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांची माहिती सुरक्षित करण्यासोबतच नवीन कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. e-KYC हा एक मोठा निर्णय असून याने कंपनीला ऑडिट करणेही सोपे होणार असल्याचे सूद यांनी म्हटले आहे.